mh 13 news network
पुणे/प्रतिनिधी :
ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित डॉ. माधवराव गाडगीळ यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने देशातील पर्यावरण चळवळीला मोठी हानी झाली असून विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. गाडगीळ यांनी भारताच्या विचारप्रवाहात पर्यावरण जनजागृती, संवर्धन आणि त्यासाठी ठोस धोरणांची गरज यावर सातत्याने भर दिला. केवळ लेखन आणि प्रबोधनापुरते न थांबता, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत व अचूक वापर कसा करावा यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले. स्थानिक लोकांच्या सहभागातून पर्यावरण संरक्षण व्हावे, हा त्यांचा मूलभूत दृष्टिकोन होता.
पश्चिम घाटांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते. भारतातील जैवविविधता कायद्याचे शिल्पकार म्हणूनही डॉ. गाडगीळ यांचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
व्रतस्थ, ध्येयवादी आणि पर्यावरण रक्षणासाठी अखंड कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. माधवराव गाडगीळ यांचे नाव कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे








