MH 13 NEWS NETWORK
उत्कर्ष महोत्सवात १६ विद्यापीठाकडून पथनाट्याचे सादरीकरण!
सोलापूर, दि.६- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय उत्कर्ष महोत्सव अंतर्गत मंगळवारी झालेल्या पथनाट्य स्पर्धेत सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर प्रभावी भाष्य करण्यात आले. महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, स्वच्छता, राजकारण, जात-धर्मवाद, आरोग्य, भाषावाद, मतदान, मराठी शाळांचे प्रश्न अशा विविध ज्वलंत मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या पथनाट्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
विद्यापीठाच्या बास्केटबॉल मैदान परिसरात ही स्पर्धा पार पडली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने ‘शूरवीरांचे एकच गाव – भीमा कोरेगाव’ हे पथनाट्य सादर करून विशेष दाद मिळवली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने ‘स्कोअर काय झाला?’ या पथनाट्यातून भाषावाद, राजकारण आणि महिला अत्याचार यांसारख्या विषयांवर जनजागृती केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघाने ‘जाहिलो का शहर हे’ या हिंदी पथनाट्याच्या माध्यमातून महिला अत्याचार, राजकारण व भ्रष्टाचारावर परखड भाष्य करत प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडले.
भारती विद्यापीठ, पुणे यांनी स्वच्छता व आरोग्य या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले, तर अमरावती विद्यापीठाने ‘माझा भारत देश विकायचा आहे’ या पथनाट्यातून सामाजिक आणि राजकीय वास्तव मांडले. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर), पंजाबराव कृषी विद्यापीठ (अकोला), एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ (मुंबई) यांच्यासह एकूण १६ विद्यापीठांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. राजेंद्र धवने, मिलिंद साळवे आणि प्रा. शिवशंकर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज पवार यांनी केले. विविध पथनाट्यांमधून हास्य, भावूकता आणि प्रबोधन यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाल्याने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना भरभरून दाद दिली.
आज समारोप व पारितोषिक वितरण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या उत्कर्ष महोत्सवाचा उद्या (बुधवारी) समारोप होणार आहे. राज्यातील १६ विद्यापीठाचा यामध्ये सहभाग असून जवळपास साडेतीनशे विद्यार्थी तीन दिवस विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करीत आहेत. मंगळवारी पथनाट्य, निबंध स्पर्धा, समूह गीत, भित्तीचित्र, वक्तृत्व आदी स्पर्धा पार पडल्या. बुधवार, ७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता पारितोषिक वितरण व समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.








