सोलापूर :महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार निर्मलाताई ठोकळ (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाने आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी नऊ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पार्थिव सकाळी अकराच्या सुमारास मुरारजी पेठेतील तोरणा बंगला येथे आणण्यात येणार असून, आज सायंकाळी पाच वाजता पुणे रोड, बाळे स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
निर्मलाताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. त्या सोलापूर शहरातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
नगर राजकारणापासून ते राज्याच्या पातळीवरील राजकारणापर्यंत त्यांनी आपल्या कार्याची ठसा उमटविला. स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला होता.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा म्हणून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक गुणी विद्यार्थी घडवले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना व नातवंडांचा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस परिवारासह शैक्षणिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे.