हरियाणातून सोलापूरमध्ये येऊन चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद – 4.76 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत
सोलापूर | दि. 09 जुलै 2025
सोलापूर एस.टी. स्टँडवरील गर्दीचा फायदा घेत प्रवाश्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या हरियाणामधील आंतरराज्यीय गुन्हेगाराला सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही आठवड्यांत हिसार (हरियाणा) येथून अटक केली. आरोपीकडून 95 ग्रॅम (9.5 तोळे) वजनाचे, 4,76,700/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
घटना व तक्रार…

परमेश्वर नरसप्पा बेळे (वय 59, रा. डोंबिवली) हे दिनांक 21 मे 2025 रोजी आपल्या कुटुंबासह मुंबईकडे जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकात होते. बसमध्ये बसल्यानंतर गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची बॅग चोरून त्यामधील मौल्यवान सोन्याचे दागिने लंपास केले. यासंदर्भात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाची दिशा…

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दोरगे व सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण केले. त्याआधारे एका संशयित इसमाचा शोध घेण्यात आला.
तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना कळले की संशयित आरोपी अजयकुमार बजरंगलाल सांसी (वय 26, रा. किरोरी, ता. हिसार, राज्य – हरियाणा) हा आंतरराज्यीय गुन्हेगार असून उत्तरप्रदेशमध्येही त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त श्री. एम. राजकुमार यांच्या परवानगीने तपास पथकाने हरियाणामध्ये जाऊन, स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने सोलापूर बस स्थानकातील चोरीची कबुली दिली.
महत्त्वाची कामगिरी…
तपासादरम्यान आरोपीकडून संपूर्ण दागिने हस्तगत करण्यात आले. हे दागिने महाराष्ट्रात विक्रीस काढण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला गाठले.
सदर आरोपीने तब्बल 1800 किलोमीटर अंतर पार करून सोलापूरमध्ये चोरी केली होती, परंतु सोलापूर गुन्हे शाखेच्या अचूक नियोजनामुळे त्याला अटक करण्यात यश मिळाले.
कारवाईत सहभाग
सदर कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकात स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्यासह पो.अं. संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, चालक पो.हे.कॉ. फरदिन शेख, तसेच सायबर पो.स्टेचे प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांचा मोलाचा सहभाग होता.
🛑 नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सावध राहून मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.