MH 13 NEWS NETWORK
सोलापूर | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाच म्हणायचा! सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आणि त्यानंतर राजकीय गणिते वेगाने फिरू लागली आहेत. एकूण 102 जागांपैकी तब्बल 51 जागा महिलांसाठी राखीव — म्हणजे यंदाच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने “महिला राज” दिसणार हे स्पष्ट आहे.

📊 आरक्षणाचे संपूर्ण चित्र असे:
अनुसूचित जाती : 15 (त्यापैकी 8 महिला)

अनुसूचित जमाती : 2 (त्यापैकी 1 महिला)
ओबीसी : 27 (त्यापैकी 14 महिला)

सर्वसाधारण : 58 (त्यापैकी 28 महिला)
एकूण 51 महिला उमेदवारांसाठी आरक्षित जागा, म्हणजे जवळपास अर्धा कारभार महिलांच्या हातात!

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही सोडत हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडली. या वेळी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगररचना विभागाचे सहायक संचालक मनीष भिष्णूरकर, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

थोडा गोड ट्विस्ट म्हणजे — महापालिका शाळा क्र. २ मधील विद्यार्थी प्रसाद इंगळे, कार्तिक गायकवाड, साक्षी वठार, अनुष्का वठार यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली.
महापालिकेचे एकूण 26 प्रभाग असून, त्यातील 1 ते 24 प्रभाग चार सदस्यीय, तर 25 व 26 प्रभाग तीन सदस्यीय आहेत.
आयुक्त डॉ. ओंबासे यांनी सांगितले की, “सोडतीनंतर 17 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. इच्छुकांनी त्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस टाऊन हॉल, सोलापूर येथे सादर कराव्यात.”
🔹 राजकीय पटलावर चर्चेचा मुद्दा:
आता मोठा प्रश्न असा — ही सोडत “भावी” नगरसेवक ठरवेल की “प्रभावी” नेत्यांची कसोटी पाहील?
महिला आरक्षणाचा आकडा नक्कीच इतिहास घडवणारा आहे; त्यामुळे पक्षनिहाय समीकरणे, गठजोडी आणि बंडखोरीचे सूर पुढील काही दिवसांत ऐकायला मिळतील, यात शंका नाही.








