MH13 NEWS NETWORK
सोलापूर दिनांक ११ फेब्रुवारी
सोलापूर शहरातील दत्त चौकात असलेल्या जुन्या दत्त मंदिरतर्फे गुरुवार दिनांक १३ ते रविवार दिनांक १६ फेब्रुवारी या कालावधीत गुरु प्रतिपदा महोत्सव होत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माघ कृष्ण प्रतिपदा हा दिवस श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा निजानंद गमन दिवस आहे. त्यानिमित्ताने प्रतिवर्षी माघ कृष्ण प्रतिपदा ते माघ कृष्ण चतुर्थी असे चार दिवस गुरुप्रतिपदा उत्सव साजरा केला जातो. उत्सव काळात अभिषेक, महापूजा दुपारी महानैवेद्य, माध्यान्ह आरती, लघु रुद्र अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात येतात. तसेच उत्सव काळात प्रतिपदा ते तृतीया असे तीन दिवस मंदिराच्या आवारातच पालखी प्रदक्षिणा होत असते.
रविवारी नगर पालखी प्रदक्षिणा
अखेरच्या दिवशी म्हणजे माघ वद्य चतुर्थी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पालखी नगर प्रदक्षिणा होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पालखी नगर प्रदक्षिणेस दत्त मंदिरापासून सुरुवात होईल. तेथून पालखी जुने राम मंदिर, टिळक चौक, फलटण गल्ली गोविंद बुवा मठ, माणिक चौक, गद्रे लक्ष्मी मंदिर, पाणीवेस गणपती मंदिर, अवधूत स्थान गणपती घाट या मार्गाने पुन्हा दत्त मंदिरात येऊन पालखी प्रदक्षिणेची सांगता होईल. सर्व भावीक भक्तांनी गुरुवारपासून सुरू होणाऱ्या गुरुप्रतिपदा उत्सवात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंदिराचे प्रमुख विनयकाका अंबलगी यांनी केले आहे.