फोंडशिरस खून प्रकरणात वाघमोडे बंधूंना उच्च न्यायालयाचा दिलासा..
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोघांना 50 हजारांच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर..
सोलापूर दि. – गावातील जमिनीच्या वादातून झालेल्या नाना अण्णा वाघमोडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या धर्मेंद्र महादेव वाघमोडे व अंकुश महादेव वाघमोडे (रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या सख्या भावांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

खटल्याची पार्श्वभूमी अशी होती…
19 ऑक्टोबर 2019 रोजी जमिनीच्या वादातून वाद चिघळला. मयत नाना अण्णा वाघमोडे यांना लोखंडी रॉड, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून ठार मारल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेप ठोठावली होती.

जामीनाची सुनावणीत अॅड.थोबडे यांनी असा केला युक्तिवाद…
आरोपींच्या बाजूने अॅड. रितेश थोबडे यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान खटल्यातील एकमेव नेत्रसाक्षीदार तुषार याचा जबाब हा पूर्वी दिलेल्या जबाबापेक्षा बदललेला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे न्यायमूर्ती सुमन शाम व शाम चंडक यांनी आरोपी धर्मेंद्र व अंकुश यांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर केला.
न्यायालयीन लढाईत आरोपीतर्फे : अॅड. रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे : अॅड. क्रांती हिवराळे यांनी काम पाहिले.