हाय व्होल्टेज प्रभाग ७ : विजयाने बदलले समीकरण, स्वीकृत नगरसेवकपदासाठी नाना काळेंच्या नावाची चर्चा
सोलापूर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हाय व्होल्टेज प्रभाग क्रमांक ७ मध्ये शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलून टाकली. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व उत्तरचे आमदार देशमुख यांनी प्रतिष्ठेचा बनवलेल्या या प्रभागात पराभव झाल्याने दोन्ही आमदारांसमोर नवे राजकीय समीकरणे बनवण्याची वेळ आली आहे.शहरात सर्वत्र भाजपाचे कमळ जोमाने फुलले असताना, पश्चिम भागातील पत्रा तालीम परिसरात भाजपाला धक्का बसला. मात्र, याच भागातील प्रभावशाली नेते व भाजपाचे उमेदवार पद्माकर ऊर्फ नाना काळे यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
प्रभाग ७ मधील भाजपाच्या उमेदवारांसाठी थेट प्रदेश पातळीवरून तिकीट आणत ‘भाऊ–दादा’ यांनी शहरातील नेतृत्वाबाबत असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, या प्रभागातील लढत अत्यंत रंगतदार ठरली.
पालकमंत्री गोरे, आमदार कोठे व आमदार देशमुख यांच्या सततच्या हालचालींमुळे राजकीय खेळींचा थरार नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिला. कुरघोड्यांच्या राजकारणात भाजपच्या तीन उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, आमदार देवेंद्र कोठे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत परिपक्व राजकीय भूमिका मांडली.
दोन टर्म नगरसेवक, माजी उपमहापौर आणि ‘पाणीदार’ नगरसेवक म्हणून ओळख असलेले नाना काळे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन आयुक्त राजेश कुमार यांच्या सहकार्याने उभारलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाक्यांमुळे प्रभागातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात दूर झाली होती.

आजही अनेक महिला मतदार या कामांची साक्ष देतात.संत साहित्याचा प्रचार करणारे श्री.विवेक घळसासी व ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने यांच्या रस्ता व स्वच्छतेच्या प्रश्नांचे एका दिवसात निराकरण केलेल्या कामांची चर्चा प्रभागात आजही होते. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नाना काळे यांना पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिल्याचा किस्साही चांगलाच चर्चेत आहे.

दरवर्षी हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत होणारा शिवजन्मोत्सव पाळणा महोत्सव, लोकमान्य गणेशोत्सवाचे नियोजन या सर्वांचे सूत्रधार म्हणून नाना काळे यांची शहरात वेगळी ओळख आहे.पत्रा तालीम भागातील संघटन क्षमता आणि नेतृत्वाचा उपयोग विविध पक्षांनी वेळोवेळी करून घेतला आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपाची ताकद वाढवण्यासाठी नाना काळे यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी द्यावी, अशी मागणी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे आणि जिल्ह्याचे भाजप नेते आमदार सचिन कल्याणशेट्टी हे तिघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशामागे या तिघांचा सिंहाचा वाटा असल्याचे सिद्ध झाले आहे.स्वीकृत नगरसेवकपदासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग सुरू असताना, पत्रा तालीम भागातून पद्माकर ऊर्फ नाना काळे यांच्या नावाची विशेष चर्चा सुरू आहे. प्रदेश पातळीवरून तिकीट आणलेल्या या नेत्याला आता स्वीकृत नगरसेवकपद मिळणार का, याकडे भाजपासह इतर पक्षांचेही लक्ष लागले आहे.







