MH 13 NEWS NETWORK
सोलापूर – प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेड, सोलापूर यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत एक अत्याधुनिक व वातानुकूलित २५ आसनी बस प्रदान करण्यात आली. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बसचा चावीप्रदान समारंभ उत्साहात पार पडला.
या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना प्रिसिजन कॅमशॉफ्टचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. यतीन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते बसची चावी सुपूर्त करण्यात आली.
कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. महानवर यांनी आपल्या भाषणात प्रिसिजन कॅमशॉफ्टच्या सामाजिक भानाचे कौतुक करत आभार मानले. “विद्यार्थ्यांच्या अभ्यासभ्रमंती, क्रीडा, सांस्कृतिक व संशोधनात्मक उपक्रमांसाठी ही बस उपयुक्त ठरणार आहे. ही सुविधा मिळाल्याने विद्यापीठाच्या प्रगतीस बळ मिळेल,” असे त्यांनी सांगितले. तसेच सोलापूर विज्ञान केंद्रासाठी देखील मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. सुहासिनी शहा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शिक्षण व सामाजिक विकासासाठी योगदान देणे ही आमची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही बस मोलाची ठरेल.”
या उपक्रमामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध बाह्य उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार असून, विद्यापीठाचा सामाजिक व शैक्षणिक दर्जाही अधिक वृद्धिंगत होणार आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी केले.









