MH 13 NEWS NETWORK
प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदार संवादातून विकासकामांचा आढावा
सोलापूर (प्रतिनिधी):
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, सौ. अंबिका नागेश गायकवाड आणि सौ. चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे.

याच अनुषंगाने मंगळवारी सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ व मार्गदर्शक लक्ष्मण जाधव तसेच प्रभाग क्रमांक २२ चे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली.
पदयात्रेदरम्यान लिमयेवाडी, कावळा गल्ली, मंजुनाथ नगर, सनत नगर आदी भागांमध्ये उमेदवारांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी नागरिकांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. प्रचारादरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख व आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध कामांची माहिती मतदारांशी संवादातून मांडण्यात आली.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या सहकार्यातून प्रभागात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी तसेच सर्व समाजघटकांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
भाजप उमेदवारांनी सांगितले की, प्रभागातील सर्व समाजघटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण विषयक प्रश्नांवर आगामी काळात प्राधान्याने काम केले जाईल.
दरम्यान, नागरिकांनीही आपल्या मनोगतातून प्रभागातील झालेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले तसेच भविष्यातील विकासासाठी अपेक्षा मांडल्या. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी विविध स्थानिक प्रश्न मांडले असून या थेट संवादामुळे प्रचाराला मोठा उत्साह व सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले








