MH 13 News Network
सोलापूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे सत्र सर्वच पक्षात सुरू झाले आहे. आज रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांची माहिती, कार्याचा अहवाल (बायोडाटा), विधानसभा मतदारसंघातील अभ्यास याबाबत मुलाखती सुरू करण्यात आल्या आहेत.
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात भावी आमदारांच्या मुलाखतीचे सत्र सुरू केले आहे.
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश बारस्कर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे हे सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.
पक्ष प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारे, सर्वसामान्य वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांना पक्षाच्या वतीने तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यावेळी वंचितचे पदाधिकारी शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, अनिरुद्ध वाघमारे, विक्रांत गायकवाड, सुरेश देशमुख, विनोद इंगळे उपस्थित होते.
भावी आमदारकीसाठी इच्छुक असणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर ओबीसी, एससी, एसटी यांचे एकत्रीकरण करून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर तिकीट वाटपाची प्रक्रिया होऊ शकते अशी चर्चा होत आहे. तिकीट वाटपाचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहेत.