MH 13 News Network
लोकसभा निवडणूक निकालानंतर सत्ताधारी महायुतीचे धाबे दणाणलेले आहे. जरांगे पाटलांच्या इफेक्टमुळे आणि सगेसोयरे अधिसूचना अंमलबजावणी झाली नसल्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणूक निकालावर झाला होता. आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची महत्त्वपूर्ण निर्णायक महाबैठक आयोजित केलेली आहे. त्यात लढायचं की पाडायचं याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यातील लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीने बाळसे धरले आहे.तर तो इफेक्ट विधानसभा निकालावर होऊ नये यासाठी महायुतीने अनेक योजनांचा अक्षरशः पाऊस पडला. लाडकी बहीण योजनेची प्रभावशाली अंमलबजावणी केल्यामुळे महायुतीकडे एक मोठा प्लस पॉईंट निर्माण झाला आहे.
एका बाजूला महाविकास आघाडी आतापासूनच सत्तेचे स्वप्न पाहत आहे तर महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणारच याचा विश्वास महायुतीचे नेते व्यक्त करत आहेत.
तिसरी आघाडी मोर्चेबांधणी करत असून या सर्व राजकीय घडामोडींवर जरांगे फॅक्टर मोठा इफेक्ट करणार आहे, हे मात्र निश्चित..!
आज रविवारी अंतरवाली सराटी या ठिकाणी होणाऱ्या बैठकीत महायुती, महाविकास आघाडीचे यश -अपयश दडले आहे, अशी चर्चा सर्वच पक्षात होत आहे.
आज पाटील काय बोलणार.? याकडे लक्ष लागले आहे.तर दुसरीकडे पाटील ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण ही विचारसरणी घट्ट बांधली गेली आहे.लोकसभेच्या निकालात जरांगे पॅटर्न यशस्वी होण्यामध्ये मुस्लिम तसेच मागासवर्गीय समाजाचा मोठा हात होता.शेतकरी वर्गाची नाराजी, महागाई,बेरोजगारी,संविधान बचाव,आरक्षण या मुद्द्यांचा परिणाम झाला होता.
लोकसभेतील बांधलेली मूठ कायम अजूनतरी आहे.महायुतीने तसेच महाविकास आघाडीने अजून तरी विधानसभेतील उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली नाही. अंतरवाली सराटीतील आजच्या निर्णयाची आतुरता जितकी मराठा समाजाला आहे.तितकीच इतर पक्षातील प्रमुखांना लागून राहिली आहे हे नक्की.
काल शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटी येथे बैठक पार पडली.या बैठकीला विधानसभा निवडणूक तज्ञ, राजकीय अभ्यासक, वकील, निवृत्त अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीनंतर आज रविवारी मराठा सेवक, राज्यातील इच्छुक उमेदवार यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.