MH 13 News Network
मनोज जरांगे पाटील यांची उद्या बुधवारी सोलापुरात शांतता रॅली आणि सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याजवळ भव्य गोलाकार स्टेज उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिकेकडून परिसराची स्वच्छता मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. पोलीस आयुक्तांनीही सभास्थळाची पाहणी केली आहे.
बुधवारी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सोलापूरला येणार आहे. विविध जाती धर्माच्या समाज बांधवांनी पाठिंबा दिल्यामुळे दहा लाखांपेक्षा जास्त संख्येने स्त्री -पुरुष नागरिक शांतता रॅलीत सहभागी होण्याची शक्यता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
हजारोंच्या संख्येने ग्रामीण भागातून वाहने दाखल होणार असून त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
भव्य स्टेजची उभारणी
मनोज जरांगे यांच्या सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य गोलाकार पद्धतीचे व्यासपीठ उभारणीचे काम पूर्ण झाले असून त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. या व्यासपीठावर लेझर शोची व्यवस्था करण्यात आली असून जरांगे पाटलांच्या आगमनांच्या वेळी लेजर शो आणि मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी केली जाणार आहे.
महापालिकेकडून स्वच्छता..
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फुटपाथ,रस्ते आणि दुभाजकामधील झाडी झुडपे यांची स्वच्छता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर बॅनर आणि स्पीकर लावण्यात आले आहेत. स्टेशन रोड, चार हुतात्मा चौक परिसर, पुणे रोड, बाळीवेस, तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली असून शहर- जिल्ह्यात शांतता रॅलीचीच चर्चा सुरू आहे.
सभेच्या तयारीसाठी पोलीस प्रशासनाने नियोजनाचा आढावा घेऊन जय्यत तयारी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त चे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. काल मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सभास्थळाची पाहणी करून नियोजन कार्याचा आढावा घेतला. तसेच प्रशासनाला योग्य ते आदेश दिले आहेत.