mh 13 news network
52 जोडपी विवाह बंधनात अडकणार
आमदार सुभाष देशमुख यांची माहिती
सोलापूर (प्रतिनिधी)
दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनतर्फे यावर्षीदेखील सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा 46 वा सामूहिक विवाह सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.यंदाचे विवाह सोहळ्याचे 20 वे वर्ष असून यावेळी 52 जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधू-वरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा हा उद्देश असून, विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे. वधू-वरांना आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गृहउपयोगी साहित्याची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे.
भोजनव्यवस्थेपासून ते नववधू-वरांचे कपडे व सर्व सुविधा फाउंडेशनतर्फे पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय वधू वरांची शहरातील प्रमुख मार्गाने रथामधून मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत. यंदा 49 जोडप्यांमध्ये 3 बौद्ध जोडपे तसेच 46 हिंदू जोडपे आहेत
सोहळ्याचे संपूर्ण स्थळ २५० बाय २०० फूट क्षेत्रफळामध्ये तयार करण्यात येणार असून भोजन व्यवस्था ९० बाय १५० फूट जागेत असेल. संपूर्ण कार्यक्रम स्थळावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यात दोन्हीकडील सुमारे 25- 30 हजार वऱ्हाडी मंडळींना भोजनाची सोय करण्यात आले आहे.भोजनात चपाती भाजी, भात व बुंदी याचा समावेश असणार आहे याशिवाय दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.तसेच नवविवाहात जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर, अभय पटणी, सुजाता सुतार, उत्तम शिंदे, बाळासाहेब घोडके, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण आधी उपस्थित होते
आतापर्यंत 3153 जोडपी विवाहबद्ध
लोकमंगल फाउंडेशनमार्फत एकूण ४6 सामूहिक विवाह सोहळे पार पडले आहेत. आतापर्यंत 3153 जोडपी विवाहबद्ध झाली असून त्यापैकी—हिंदू : २४४३ जोडपी, बौद्ध : ६७८ जोडपी,मुस्लिम : २१ जोडपी, ख्रिश्चन : ०४ जोडपी, जैन : ०७ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
यंदा जिल्हा पर्यटनाची थीम…
विवाह सोहळ्याला यंदा विशेष आकर्षण मिळणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी सुरू केलेल्या *‘जिल्हा पर्यटन महोत्सवा’*च्या धर्तीवर या विवाह सोहळ्यातही जिल्हा पर्यटन थीम राबविण्यात येत आहे.
विवाह सोहळा आयोजित करण्यात येणाऱ्या ग्राउंडवर जिल्ह्यातील विविध गावांची वैशिष्ट्ये आणि पर्यटनस्थळांची माहिती आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केली जाणार आहे. पर्यटनदृष्ट्या महत्वाची असणारी ठिकाणे, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा दर्शविणारे पॅनेल्स, माहिती फलक आणि मांडणी याचा समावेश असेल.
विशेष म्हणजे, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सोहळा स्थळी ठेवण्यात येणार असून “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा प्रेरणादायी संदेशही झळकविण्यात येणार आहे.









