मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षण ओबीसी पोटातून मिळावे, या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला माढा सकल मराठा समाजाच्या टीमने भेट देऊन दादांना आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला. यावेळी आंदोलकांना अन्नधान्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन मराठा समाजाने माढ्यातून मुंबईला आवश्यक वस्तू पाठवण्यात येणार आहेत.

आझाद मैदानाच्या शेजारी जिल्हाभरातून आणि तालुकाभरातून आलेल्या हजारो मराठा बांधवांना अन्न, पाणी व निवाऱ्याची कमतरता भासत असल्याचे लक्षात घेऊन माढा शहरातील सकल मराठा समाजाने तातडीने पुढाकार घेतला.

स्थानिक नागरिक व सामाजिक बांधवांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ संकलित करून ते आंदोलकांपर्यंत पोहचविण्याचे काम हाती घेण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत दोन क्विंटल बुंदीचे लाडू, दोन क्विंटल चिवडा, बिस्किट, पाणी बाटल्या, शेंगदाणा चटणी, फरसाण, तसेच भाकरी, चपाती, ठेचा आणि चटणी अशा विविध पदार्थांचे पॅकेट्स तयार करून दोन पिकअप वाहनांमधून आझाद मैदान येथे रवाना करण्यात आले.
आज आझाद मैदानावर पोचणार अन्नधान्याची मदत..
दिनांक 2 ऑगस्ट रोजी हे सर्व पदार्थ आंदोलकांना वाटप करण्यात येणार आहेत. “फुल नाही, फुलाची पाकळी” या भावनेतून ही मदत करण्यात आली असून, माढा सकल मराठा समाज व परिसरातील बांधवांनी यासाठी मनापासून योगदान दिले आहे. अशी प्रतिक्रिया विधीज्ञ विजयकुमार आडकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.