MH 13News Network
सोलापूर प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवी धार देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील ६ ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत. सकाळी १० वाजता सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात त्यांच्या आगमनानंतर दिवसभर महत्त्वपूर्ण बैठका पार पडणार आहेत.
या दौऱ्यात जरांगे पाटील सोलापूर शहर व जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार, तर नव्याने आंदोलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनाही थेट मार्गदर्शन मिळणार आहे.
29 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आणि इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषण सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोट्यावधीच्या संख्येत असलेल्या मराठा समाजाला आवाहन करण्यासाठी त्यांचे दौरे सुरू झाले आहेत.
सोलापूर जिल्हा हा मराठवाड्यानंतर आरक्षण आंदोलनातील प्रभावी जिल्हा म्हणून ओळखला जातो.
डाक बंगला येथे होणाऱ्या चर्चासत्रांतून समाजबांधवांच्या सूचना, अपेक्षा आणि स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आंदोलनाच्या पुढील टप्प्याची घोषणा केली जाणार आहे.“
आरक्षणाच्या लढ्यात प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे” या संदेशासह सकल मराठा समाज – सोलापूर शहर व जिल्हा यांनी सर्व मराठा बांधवांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. समाजाच्या एकजुटीनेच आरक्षणाच्या लढ्याला निर्णायक वळण मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
📌 तारीख – ६ ऑगस्ट
📍 स्थळ – शासकीय विश्रामगृह, सात रस्ता, सोलापूर
🕙 वेळ – सकाळी १० वाजता—