mh 13 news network
प्रभाग ६ : देगावमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ भीमशक्ती एकवटली
विकासाच्या अजेंड्यावर भाजपच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्धार


सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे पॅनल प्रमुख उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच दिवसांपासून आक्रमक प्रचार सुरू असून, होम-टू-होम संपर्कामुळे नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

शुक्रवारी देगाव येथे भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने भीमशक्ती एकवटली. देगावमधील भीमनगर येथे समाज मंदिरात तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना करण्यात आली. यानंतर झालेल्या बैठकीत भीमनगरातील भीमगर्जना तरुण मंडळ व भीम बांधवांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा एकमुखी संकल्प केला.

यावेळी “जय भीम”, “जय भवानी, जय शिवाजी” आणि “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. गेल्या अनेक वर्षांत भीमनगर परिसरात विकासाची महत्त्वपूर्ण कामे करण्यात आली असून, आगामी काळात सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार असल्याने विकासकामांना अधिक गती मिळेल, असे पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी सांगितले. विकास हेच भाजपचे व्हिजन असून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शहराच्या प्रगतीसाठी काम केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास भीमगर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांच्यासह बाबा तोरणे, विनोद नाना गायकवाड, गोपी तिकुटे, संभा भोसले, भिमरत्न गायकवाड, सागर डोलारे, रतन गायकवाड, रवी निकंबे, रमेश गायकवाड, रतन पवार, दयानंद गायकवाड, रोहित भवाळ, सुखदेव गायकवाड, अजित साबळे, भीमा गायकवाड, चंद्रकांत निकंबे, दूर्वा गायकवाड, सोमा गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने भीम बांधव व भगिनी उपस्थित होत्या.
वानकर कुटुंब : सर्व जाती-धर्मांना सोबत घेणारा विकासाभिमुख परिवार

सोलापूरच्या सर्वपक्षीय राजकारणात वानकर कुटुंबाला मानाचे स्थान आहे. विकासाला प्राधान्य देत सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करणारा परिवार म्हणून वानकर कुटुंबाची ओळख आहे. याच विश्वासावर देगावमधील संपूर्ण भीमशक्ती भाजपच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणार असल्याचा विश्वास भीमगर्जना तरुण मंडळाचे अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी व्यक्त केला. भाजपच्या संपूर्ण पॅनलला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.








