मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यातील मानाचे गणपती हे राज्यातील एक सन्मानाचा वारसा आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे. सर्वांना सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. सर्वांना सुबुद्धी देवो, सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गणेश चरणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन ‘श्रीं’चे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा विविध मंडळांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यांनी कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ केसरीवाडा या मानाच्या गणपती मंडळांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, साई गणेश मित्रमंडळ, साने गुरुजी तरुण मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी त्यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. पाटेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत व सत्कार केला.

पुणे येथील गणेश मंडळांना भेटीप्रसंगी केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाचे उत्सवप्रमुख डॉ. रोहित टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष सुनील रासने, साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.

