mh 13 news network
सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस–महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध शायर व खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या जाहीर सभा रविवारी सोलापूर शहरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या सभांमधून त्यांनी शेरो-शायरीच्या माध्यमातून केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

या प्रचार सभांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जाहीर सभा सायंकाळी जिंदा शहा मदार चौक, बाशा पेठ तसेच ताश्कंद चौक, शास्त्री नगर येथे आयोजित करण्यात आल्या. दोन्ही ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सभेत बोलताना खासदार इम्रान प्रतापगडी यांनी महागाई, बेरोजगारी, गॅस सिलेंडर दरवाढ आणि सर्वसामान्यांच्या दैनंदिन प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
“कहा सोया है चौकीदार,
गॅस सिलेंडर की किंमत एक हजार के पार…”

असा नज्म सादर करताच सभास्थळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
सोलापूर शहरातील रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि वाढती महागाई याबाबत सत्ताधारी पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस व महाविकास आघाडीच सोलापूरच्या सर्वांगीण, समतोल आणि लोकाभिमुख विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी उपस्थित नेत्यांनीही सोलापूर शहराच्या विकासासाठी काँग्रेस–महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. शेरो-शायरी, घोषणाबाजी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या जाहीर सभा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्या









