MH 13 News Network
सोलापूर : सोलापूर शहरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मध्ये नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी घुसत असल्याने आणि नळाला दूषित पाणी येत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी सामाजिक संघटनेचे शहर संघटक अजय उर्फ रावण मैंदर्गीकर यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्या शासकीय वाहनावर गटारीचे पाणी टाकून निषेध नोंदवला. हा प्रकार आज सोमवारी महापालिका इमारतीमध्ये घडला.
अजय उर्फ रावण मैंदर्गीकर हे सोमवारी सकाळी आंबेडकर नगर परिसरातील महिलांच्या सोबत महापालिकेमध्ये आले होते. या भागातील दुर्गंधीमुळे वैतागलेल्या महिला आणि मैंदर्गीकर यांनी एका ड्रम मध्ये आणलेले घाण पाणी महापालिका आयुक्तांच्या गाडीवर ओतले. तेव्हा त्या ठिकाणी बंदोबस्त असलेल्या पोलिसांनी मैंदर्गीकर यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना केले.
निवेदनात या होत्या मागण्या..!
डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान रिक्षा स्टॉप ते पंचशील तरुण मंडळ येथील मस्जिद पर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीट करून देण्यात यावा..
मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर मधील संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलून नवीन व मोठी लाईन करून देण्यात यावी..
संपूर्ण नगरातील रस्ते सिमेंट काँक्रीट करण्यात यावे,
नगरातील सर्व सार्वजनिक शौचालये दुरुस्त करावीत..
या सर्व मागण्या 15 ऑगस्ट च्या आत पूर्ण करण्यात याव्या अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगर पालिकेमधे 15 ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील.या आंदोलना दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महापालिकेत खळबळ उडाली होती.
पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.