MH 13 News Network
म्हणतात की… गाईपासून वासरू..! आईपासून लेकरू..! दूर गेल्यावर काय होते हे फक्त आईला आणि गाईलाच कळू शकते..! परंतु सोलापूर शहरातील फौजदार चावडी मधील वर्दी मधील माणुसकीने संवेदनशीलता जपून ऑपरेशन मुस्कान च्या माध्यमातून अवघ्या तीन वर्षाचे बाळ आईच्या स्वाधीन केले..!
नेमकं काय घडलं..
फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे ॲम्बेसिडर हॉटेलच्या समोर 03 वर्षाचा मुलगा बेवारस स्थितीत रडत असलेला पोलीस शिपाई श्री.वामने (बीट मार्शल) यांना मिळून आला. त्यांनी तात्काळ सदर बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या भागात विचारपूस केली. परंतु, सदर बालकाचे पालक त्यांना जवळपास कुठे आढळून आले नाही.
त्यामुळे वामने यांनी त्या बालकास पोलीस स्टेशनला आणून ऑपरेशन मुस्कान पथकाच्या स्वाधीन केले.
ऑपरेशन मुस्कान पथकाने त्या बालकास जवळ घेऊन त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून सदर बालकाचा फोटो स्थानिक लोकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर प्रसारित केला.
त्यामध्ये त्याच्या पालकांबाबत माहिती मिळाल्याने तातडीने त्याच्याशी संपर्क करून खातरजमा करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. आधार कार्ड तसेच इतर महत्त्वपूर्ण बाबींची पडताळणी करून लागलीच उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या बालकाचा ताबा त्याच्या पालकांकडे दिला. तेव्हा त्या मातेच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.
ऑपरेशन मुस्कान पथकाने केलेल्या प्रयत्नामुळे अवघ्या 04 तासात बाळाला कायदेशीर पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन मुस्कान पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे पाटील, पोलीस शिपाई पाटील व वामने यांनी केला आहे.
या संवेदनशील कामगिरी बाबत जनतेमधून आणि पोलीस आयुक्तालयातून अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.
या कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त श्री.एम राजकुमार,पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ. श्री.विजय कबाडे व फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अरविंद माने यांनी पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आवाहन..!
अशाप्रकारे एखादे बालक शहर परिसरात कुठेही आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी. जेणेकरून अशी मुले त्यांच्या पालकांपर्यंत सुखरूपरीत्या पोहोचतील. तसेच पालकांनी आपल्या पाल्यांबाबत योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.