MH 13 NEWS NETWORK
राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एम,एस,एम,ई,) क्षेत्राच्या कार्यक्षमता व उत्पादकतेत वाढ करून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ या जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) व निर्यात प्रचालन उपक्रमांद्वारे निर्यातवृद्धीस चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे.
मुंबई उपनगरासाठी 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत एमएसएमई, विकास व सुविधा कार्यालय, साकीनाका, मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, ती जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निर्यात प्रचालन समिती, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे
त्याचप्रमाणे, मुंबई शहरासाठी ही कार्यशाळा 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा निर्यात प्रचालन समिती, मुंबई शहर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या कार्यशाळांमध्ये राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योगविषयक योजना, उपक्रम, अनुदाने, निर्यात संधी, तसेच रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीबाबत सविस्तर माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मुंबई शहर व उपनगरातील सर्व शासकीय कार्यालये, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, उद्योग समूह, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचे लाभार्थी, निर्यातदार तसेच उदयोन्मुख उद्योजकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहावे, असे आवाहन उद्योग सहसंचालक, मुंबई प्राधिकरण विभाग, चेंबूर यांच्याकडून करण्यात आले आहे.
मर्यादित बैठक व्यवस्था असल्याने इच्छुकांनी didicmumbai@gmail.com या ई-मेलवर किंवा https://forms.gle/nmB97ostLrz9e3No9 या लिंकवर नोंदणी करून आपली उपस्थिती निश्चित करावी.







