MH 13 NEWS NETWORK
शासनाने सुरू केलेली ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ही योजना नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवांचा सुलभ लाभ मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील प्रत्येक सेवा केंद्र हे नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक व्हावे, अशी अपेक्षा माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली
आपले सरकार सेवा केंद्र वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे तसेच मुंबई उपनगरातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

पालक मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, आज जगभर माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या युगात सायबर धोकेही वाढले आहेत. महाराष्ट्राचा सायबर सुरक्षा सेल सक्षम आहे, तरीही प्रत्येक सेवा केंद्राने जबाबदारीने काम करून नागरिकांची माहिती सुरक्षित ठेवावी. तंत्रज्ञानाचा वापर काळजीपूर्वक करावा.

2018 च्या शासन निर्णयानुसार 25 हजार लोकसंख्येच्या मागे एक सेवा केंद्र होते, आता ती संख्या वाढवून दोन केंद्रे करण्यात आली आहेत. या माध्यमातून नागरिकांना दाखले, प्रमाणपत्रे, नॉन-क्रीमीलेअर, अधिवास, उत्पन्न दाखला अशा एक हजारहून अधिक सेवांचा लाभ मिळतो. शासन कार्यालयात वारंवार फेऱ्या न मारता, नागरिकांना त्यांच्या परिसरातच सेवा मिळावी, हा या योजनेचा हेतू असल्याचेही पालकमंत्री ॲड शेलार यांनी सांगितले
महाराष्ट्र शासन लवकरच सेवा केंद्रांच्या ब्रँडिंगसाठी व्यावसायिक संस्थेशी करार करणार असून, केंद्रांच्या कामकाजात एकसंध आणि व्यावसायिकता आणली जाणार असल्याचे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 238 सेवा केंद्रांना या कार्यक्रमात प्रमाणपत्रे देण्यात आली. यात 7 दिव्यांग व्यक्तींना तर एका तृतियपंथीयाचासुद्धा सहभाग आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की, आपले सरकार सेवा वितरण अधिक कार्यक्षम करण्यासाठी तांत्रिक सुधारणा राबविण्यात येत आहे. व्हॉट्सॲपद्वारे प्रमाणपत्र पाठविणे, अर्ज प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणे आणि सर्व ‘आपले सरकार’ तसेच आधार केंद्रांचे जिओ-टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या जवळच्या सेवा केंद्राचे ठिकाण गुगल मॅप व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे सहजपणे कळू शकते.
जिल्हाधिकारी श्री.कटियार म्हणाले की, तहसील कार्यालयातील सेतू केंद्रांचे आधुनिकिकरण सुरू असून, जशी सुविधा पासपोर्ट कार्यालयात मिळते तशीच सुविधा नागरिकांना सेतू कार्यालयात मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंधेरी तालुक्यात प्रभागनिहाय 54, बोरीवली तालुक्यात प्रभागनिहाय 67 व कुर्ला तालुक्यात प्रभागनिहाय 117 आपले सरकार सेवा केंद्राचा समावेश आहे.
उपजिल्हाधिकारी (संगांयो), राजेंद्र पाटोळे, उपविभागीय अधिकारी, प्रशांत ढगे, तहसीलदार, राजेंद्र जव्हाण, तहसीलदार अंधेरी, स्नेहलता स्वामी उपस्थित होते, तहसीलदार, राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.









