दुष्कर्मप्रकरणी अटकेत असलेल्या नृत्य शिक्षकास कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन
सोलापूर (प्रतिनिधी) – पंढरपूर येथील अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नृत्य शिक्षक विशाल दिगंबर पाटोळे (रा. पंढरपूर) याला कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. शिवकुमार दिघे यांनी जामीन मंजूर केला आहे.
घटनेनुसार, पीडिता राहात असलेल्या परिसरात डान्स क्लास घेणारा आरोपी विशाल पाटोळे याची पीडितेशी ओळख झाली. दोघांमध्ये इंस्टाग्रामवर चॅटिंग सुरू होती. एप्रिल 2023 मध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने घाटावर बोलावून लग्न करतो या आमिषाने आरोपीने पीडितेवर दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. त्यानंतरही त्याने दोन ते चार वेळा संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पीडितेला तब्येतीच्या तक्रारींमुळे तिच्या आईने डॉक्टरांकडे नेले असता ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत आईने चौकशी केली असता पीडितेने संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली व आरोपीला अटक करण्यात आली.
विशाल पाटोळे याचा जामीन अर्ज पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
असा होता युक्तीवाद..
अर्जाच्या सुनावणीदरम्यान अॅड. रितेश थोबडे यांनी फिर्याद उशिराने दाखल झाल्याचा मुद्दा तसेच गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे, असा युक्तिवाद केला.
न्यायालयाने तो ग्राह्य धरत ₹20,000 च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.या प्रकरणात अर्जदार तर्फे अॅड. रितेश थोबडे व अॅड. किरण सराटे यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे एस. एस. चौधरी यांनी बाजू मांडली.








