MH13 News Network
महविकास आघाडीत बंडखोरी झाली असून 245 माढा विधानसभा मतदारसंघासाठी माढा नगरपंचायतीच्या काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष ॲड.मीनल साठे यांनी आज (28 ऑक्टोंबर) रोजी हजारो महिलांच्या शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. मीनल साठे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महाविकास आघाडीला याचा मोठा फटका बसेल अशी चर्चा माढ्यात सुरू आहे. लाडक्या बहिणीसाठी हजारो महिला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वी सर्व महिला व पुरुष मतदारांच्या समवेत माढेश्वरी मंदिर ते तहसील कार्यालय व जगदाळे मंगल कार्यालयाशी पदयात्रा काढून त्याचे रूपांतर जाहीर सभेमध्ये करण्यात आले. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे हे उपस्थित होते.
या मेळाव्यासाठी संबोधित करताना दादासाहेब साठे यांनी सांगितले की गेल्या 30 वर्षापासून आम्ही आघाडीचे व महाविकास आघाडीचे काम करत आहोत परंतु निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जाणून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या पाठिंबावर या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहे. यावेळी अनेक उपस्थित महिला कार्यकर्त्यांनी महिला सबलीकरणासाठी या निवडणुकीत आम्ही मीनल ताई च्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असे सांगण्यात आले.
त्यानंतर नगराध्यक्ष मीनल साठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता हीच माझा पक्ष असून मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून मी मागील दहा वर्षापासून केलेले सामाजिक व राजकीय कार्य विचारात घेऊन महाविकास आघाडीतील नेत्यांनी मला उमेदवारी द्यावी असे मी मागणी केलेली आहे. या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व पायाभूत समस्या सोडवण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी सामोरे जाणार आहे.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार धनाजीराव साठे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाराच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली व त्यांच्याच विचाराने आम्ही माढा तालुक्यात आजपर्यंत काम करत आलेलो आहोत. येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर साठे गटातून सक्षम असे मिनल साठे याच्या रूपाने नेतृत्व देत आहे तरी आपण सर्व जनतेने त्यांना पाठीशी खंबीरपणे उभा राहून निवडणुकीत विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.
या जाहीर सभेसाठी संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक माढा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक सभापती विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन विविध पदाधिकारी तसेच यावेळी महिलांची संख्या लक्षणीय उपस्थित होती.