शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
सांगली : खाजगी शाळामध्ये ज्या प्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पध्दतीने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळून आदर्शवत भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी पुढे येणे गरजेचे आहे, अशा भावना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केल्या.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ च्या शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी सांगली येथील स्फुर्ती चौकातील महानगरपालिकेच्या शाळा क्र. ७ मध्ये पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मुलांचे गुलाबपुष्प व रोपटे देवून स्वागत केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, कार्यक्रम अधिकारी सतिश कांबळे, राकेश दड्डणावर यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्हा नियोजनमधून महानगरपालिकेला जो निधी दिला जातो त्यातील जास्तीत जास्त निधी शाळेसाठी द्यावा. काही मुले शाळेत लांबून येत असतात या मुलांना शाळेत आणण्यासाठी बस व्यवस्थेबाबतचा प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्या शाळांना वर्ग खोल्यांची कमतरता आहे, अशा शाळांना आवश्यक वर्ग खोल्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
शाळेमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिश मधून शिकण्याची संधी मिळत आहे. शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत आवश्यक सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित मुलांना शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, राकेश दड्डणावर यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सन २०१९ मध्ये शाळेची पटसंख्या ७० होती ती आता सुमारे ४५० पर्यंत पोहचली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पहिली ते पाचवी पर्यंत असणाऱ्या या शाळेस सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग मंजूर करून दिल्याबद्दल शाळेच्यावतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा आर्यविन ब्रिज पुलाची प्रतिमा भेट देवून यावेळी सत्कार करण्यात आला.