MH 13 NEWS NETWORK
सोलापूर, दि. 9- कर्मयोगी अप्पासाहेब काडादी, सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे, शिक्षणमहर्षी दी. शि. कमळे गुरुजी, माजी आमदारद्वय बाबूराव चाकोते, गुरुनाथ पाटील आणि माजी मंत्री आनंदराव देवकते या नेत्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाचे स्वप्न बाळगून अनेक संस्थांच्या माध्यमातून कार्य केले.
परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांत त्यांच्या संस्थांना राजकीय द्वेषभावनेने त्रास देण्याचा प्रयत्न केला. अशा सुडाचे राजकारण करणार्या व्यक्तीला बाजूला करण्यासाठी सर्वांनी एक दिलाने लढा दक्षिण सोलापूरच्या हरितक्रांतीचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला विजयी करा, असे आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी केले.
शुक्रवारी, काडादी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी, बोळकवठे, बरूर, टाकळी, कुरघोट, औज, कारकल, माळकवठे, लवंगी आदी गावांचा झंझावाती दौरा करून मतदारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांचे सर्व गावांमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. दक्षिण सोलापूरच्या विकासासाठी काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार या दौर्यात मतदारांनी केला. काडादी यांच्या या दौर्यात स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष महादेव पाटील, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील आदी उपस्थित होते.
काडादी म्हणाले, संस्थात्मक जबाबदारीमुळे आजपर्यंत आपण राजकारणापासून अलिप्त होतो. परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांत मला व्यक्तिगत आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी व त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत परिश्रमाने उभारलेल्या संस्थांना जाणिवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाला.
हजारो लोकांची रोजीरोटी अवलंबून असलेला सिध्देश्वर साखर कारखाना बंद पडावा यासाठी या कारखान्याची चिमणी पाडली गेली. ज्यांना या मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर सहकारमंत्रिपद मिळाले, त्याच मंत्र्याने सहकारातील साखर कारखाना उद्ध्वस्त करून शेतकर्यांच्या घरादारावर नांगर फिरविण्याचे पाप केले. सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी सहकार चळवळीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला. केंद्रात, राज्यात, जिल्हा परिषद, महापालिका तसेच पंचायत समितीवर भाजपची सत्ता असतानाही या मतदारसंघातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी गेल्या दहा वर्षांत तालुक्याला उजनीचे पाणी मिळवून दिले नाही. विजेचे प्रश्न सोडविले नाहीत.
भीमा आणि सीना नद्या कोरड्या पडल्यानंतर उजनीतून पाणी सोडण्यासाठी शेतक//र्यांना संघर्षाची भूमिका घ्यावी लागली. सर्व प्रकारची सत्ता असूनही भाजपच्या लोकप्रतिनिधीस जनहिताची कामे करता आली नाहीत. नवे उद्योग आणून तरुणांना रोजगार देता आले असते. मात्र, केवळ सुडाच्या राजकारणामुळे तालुका विकासापासून वंचित राहिला. एकही ठळक काम ते करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना बाजूला सारून दक्षिण सोलापूरमध्ये विकासाची गंगा आणण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी होणार्या निवडणुकीत माझे चिन्ह असलेल्या ‘कॉम्प्युटर’समोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद द्या, अशी हाक काडादी यांनी मतदारांना दिली.
नेत्यांच्या सांगण्यावरूनच
आपली उमेदवारी
संस्थात्मक कार्याच्या जबाबदारीमुळे आजपर्यंत आपण राजकारणापासून अलिप्त होतो. गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून आपल्याला व्यक्तिगत आणि सिध्देश्वर परिवारातील संस्थांना या मतदारसंघातून निवडून गेलेल्यांनी जाणिवपूर्वक त्रास दिला. त्यामुळे राजकारणात येणे भाग पडले.
लोकसभा निवडणुकीत आपण सर्वांनी भाजपचा पराभव करून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना निवडून दिले. या विधानसभा निवडणुकीत सर्व नेतेमंडळींच्या चर्चेअंती व जनभावनेनुसार मी निवडणूक लढवित आहे. आपल्या प्रचारात काँग्रेसची सर्व नेतेमंडळी सोबत आहेत. गेल्या दहा वर्षांत केवळ द्वेष आणि सुडाचे राजकारण करून त्रास दिलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधीला दूर सारा आणि तालुक्यात विकासाची गंगा आणण्यासाठी ‘कॉम्प्युटर’चे चिन्ह असलेले बटण दाबून मला विजयी करा, असे आवाहन धर्मराज काडादी यांनी केले.