‘रायगडवाडी’ नामकरणाचा ऐतिहासिक निर्णय : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार देवेंद्र कोठे, शिवभक्त गुरुशांत धुत्तरगांवकर व सहकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
सोलापूर | प्रतिनिधी
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या छत्र निजामपूर या गावाचे नामकरण पुन्हा ‘रायगडवाडी’ असे करण्यात आल्याने संपूर्ण शिवप्रेमी समाजात आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शनिवारी आमदार देवेंद्र कोठे आणि शिवभक्त गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याला हिंदवी स्वराज्याची राजधानी बनवले त्या रायगड परिसराचे नाव पूर्वी रायगडवाडी होते. मात्र नंतर त्याचे नामकरण छत्र निजामपूर असे करण्यात आले होते.

देशभरातील शिवभक्तांनी या नावात बदल करून पुन्हा “रायगडवाडी” हे ऐतिहासिक आणि गौरवशाली नाव बहाल करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली होती.
अखेर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ती मागणी पूर्ण करत छत्र निजामपूरचे नाव ‘रायगडवाडी’ असे करण्याचा निर्णय जाहीर केला.
याबद्दल आमदार देवेंद्र कोठे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने जयकुमार गोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आषाढी वारीच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दलही आमदार कोठे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे,माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर,पवन खांडेकर,सागर भोसले,आकाश भोसले,अभिषेक चिंता,अंबादास सकिनाल,धनराज दुडम हे मान्यवर उपस्थित होते.
या ऐतिहासिक निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावास पुन्हा स्वाभिमानाचे नाव मिळाले आहे.
Jaykumar Gore Devendra Fadnavis CMOMaharashtra Kothe Devendra Rajesh