ठेवीदारांना व्यवहारांवर मर्यादा; ₹५ लाखांपर्यंतच संरक्षण..
सोलापूर, दि. ७ ऑक्टोबर :भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ३५(अ) सह कलम ५६ अंतर्गत समर्थ सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर या बँकेवर कठोर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध ७ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहतील.

या निर्देशांनुसार, बँकेस आरबीआयची पूर्वपरवानगीशिवाय नवीन कर्ज देणे, ठेवी स्वीकारणे किंवा खातेदारांना पैसे परत देणे शक्य राहणार नाही. मात्र बँकेस कर्मचाऱ्यांचे वेतन, वीजबिल, भाडे आदी आवश्यक खर्चांसाठी निधी वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.आरबीआयने स्पष्ट केले आहे की, बँकेची तरलता स्थिती अत्यंत कमकुवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

बँकेच्या संचालक मंडळाशी झालेल्या चर्चेनंतरही ठोस सुधारात्मक उपाय न झाल्याने ठेवीदारांच्या हितासाठी हे निर्बंध घालण्यात आले आहेत.दरम्यान, समर्थ बँकेतील ठेवीदारांना डीआयसीजीसी (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) या हमी योजनेअंतर्गत त्यांच्या ठेवींवर ₹५ लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले की, या निर्बंधांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द झालेला नाही. बँकेची स्थिती सुधारल्यास निर्बंध शिथिल करण्याचा विचार करण्यात येईल. आरबीआय बँकेची आर्थिक स्थिती सतत पाहणीखाली ठेवणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
(प्रेस प्रसिद्धी क्र. : २०२५-२०२६/१२६६)स्रोत : भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई—
अध्यक्ष दिलीप अत्रे यांची प्रतिक्रिया…

समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “बँकेची सद्यस्थिती जरी बिकट असली तरी सर्व खातेदारांनी संयम राखावा आणि बँकेला साथ द्यावी. मेडिकल इमर्जन्सी आणि तातडीच्या खर्चासाठी पैसे मिळावेत यासाठी आम्ही आरबीआयला मेलद्वारे विनंती केली आहे.”अत्रे यांनी पुढे सांगितले की, काही इन्वेस्टर मंडळींनी बँकेला आर्थिक साथ देण्याचे आश्वासन दिले असून सुमारे ₹१०० कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे
तात्काळ काढले होते प्रसिद्धीपत्रक…

दरम्यान, समर्थ बँकेने देखील प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपली बाजू स्पष्ट केलीय. गेल्या तीन महिन्यात बँकेने लक्षणीय प्रगती केली आहे. तसेच सभासदांचे भागभांडवल दुप्पटीने वाढले आहे. बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी यासंदर्भात भारतीय रिझर्व बँकेच्या संपर्कात असून बँकेवरील ही बंधने लवकरात लवकर हटतील, असा विश्वास समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केलाय.
खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण

निर्बंधांची बातमी जाहीर होताच शहरात चर्चेचा विषय ठरली.सकाळपासूनच अनेक महिला-पुरुष खातेदार बँकेत धाव घेत होते. पैसे काढता येणार नाहीत हे कळल्यावर संतप्त खातेदारांनी बँक अधिकाऱ्यांना आणि संचालक मंडळाला जाब विचारला.बँकेच्या कार्यालयाबाहेर बाऊन्सर आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पैसे अडकले असल्याने अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. हप्ते, वैद्यकीय खर्च आणि सणासुदीच्या तयारीसाठी आवश्यक निधी न मिळाल्याने खातेदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.बँकेचे संचालक मंडळ सतत खातेदार, अधिकारी आणि आरबीआयच्या संबंधित विभागाशी संपर्कात आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
समर्थ सहकारी बँकेवर ६ महिन्यांचे निर्बंध
ठेवी, पैसे काढणे, कर्ज देणे सर्व व्यवहारांवर मर्यादा
ठेवीदारांना ₹५ लाखांपर्यंत विमा संरक्षण
बँकेचा परवाना कायम; RBI सतत निरीक्षणात
खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण, दिवाळीपूर्वी मोठा धक्का