mh 13 news network
तिरुपती देवस्थानचे अध्यात्मिक सल्लागार डॉ. चागंटी कोटेश्वर राव

श्री माता देवी वैभवम कथेवरील प्रवचनाचा भक्तिमय वातावरणात समारोप : भाविकांची प्रचंड गर्दी
सोलापूर : प्रतिनिधी
मनुष्याला दिलेली वाणी ही श्री माता देवीची कृपा आहे. मनुष्याच्या जन्माच्या सार्थकतेसाठी त्या वाणीने भगवंताचे स्मरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तिरुपती देवस्थानचे अध्यात्मिक सल्लागार डॉ. चागंटी कोटेश्वर राव यांनी केले. वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान आणि संतोषी माता गोशाळा यांच्यातर्फे वल्याळ मैदानावर आयोजित डॉ. राव यांच्या ‘श्री माता देवी वैभवम’ या विषयावरील तीन दिवसीय अध्यात्मिक प्रवचनाचा समारोप सोमवारी भक्तीमय वातावरणात झाला. याप्रसंगी भाविकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती.
यावेळी डॉ. राव म्हणाले की, गाईचा निवास तिथे असतो ती जागा अतिपवित्र असते. वेदांनीही गाईचे महत्त्व सांगितले आहे. गोसेवा करणाऱ्यांच्या घरात लक्ष्मीचा निवास असतो. गाईमध्ये लक्ष्मीचे शाश्वत निवासस्थान असते, असेही डॉ. राव यांनी सांगितले.
धनाचा खर्च केला तर धन कमी होते. परंतु विद्या इतरांना दिली तर त्यात वृद्धी होते. विद्या गुरूंचीही गुरु असते. विद्येविना मनुष्य पशुसमान असतो. मनुष्याकडे असलेली विद्या प्रवाहासारखी असावी. आपल्याला अवगत असलेली विद्या सर्वांमध्ये वाटावी, असेही डॉ. चागंटी कोटेश्वर राव यांनी सांगितले.
भगवंताच्या केवळ नामाने मनुष्याची पापे जळून जातात. त्यामुळे शरीरात शक्ती असेपर्यंत ईश्वराचे नामस्मरण करावे. शरीर थकल्यानंतर नामस्मरण करून उपयोग नाही, असेही डॉ. चागंटी कोटेश्वर राव म्हणाले.
याप्रसंगी डॉ. राव यांनी श्री शंकराचार्य विरचित ‘सौंदर्य लहरी’ मध्ये असलेले देवी मातेचे वैभव अत्यंत रसाळ भाषेत विशद केले. तसेच समुद्रमंथनानंतर शंभू महादेवांनी हलाहल विष प्राशन केलेल्या प्रसंगाची माहिती आणि महत्त्व ओघवत्या वाणीत सांगितले.
डॉ. राजेंद्र गाजुल यांनी प्रास्ताविक केले. रेणुका बुधारम यांनी सूत्रसंचालन तर वासुदेव इप्पलपल्ली यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी डॉ. सूर्यप्रकाश कोठे, डॉ. राजेंद्र गाजुल, डॉ. श्रीकांत माकम, सुयश खानापुरे, अमोल जोशी, गणेश बुधारम, मुरलीधर आरकाल, भूपती कमटम, नागनाथ पोरंडला, डॉ. प्रभाकर गुंडू, विजय उडता, रामकृष्ण सुंचू, पेंटप्पा गड्डम आदी उपस्थित होते.









