MH13NEWS Network
बार्शी (प्रतिनिधी) – पत्नी मिनाक्षी साबळे हिचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या संतोष जगन्नाथ साबळे (रा. सारोळे, ता. बार्शी) या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.
क्रेन घेण्यासाठी माहेरहून २५ हजार रुपये आणत नसल्याच्या कारणावरून आरोपी संतोष साबळे याने पत्नी मिनाक्षीवर मारहाण करून तिच्यावर रॉकेल ओतून खून केला, असा आरोप वैराग पोलिसांनी दाखल केला होता.

या प्रकरणात बार्शी सत्र न्यायालयाने संतोष साबळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.सदर शिक्षेविरुद्ध आरोपीने आपल्या वकिलामार्फत ॲड. जयदीप माने यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात अपील व जामीन अर्ज दाखल केला होता.
या अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली.

सुनावणीदरम्यान ॲड. जयदीप माने यांनी मांडणी केली की, मृत्युपूर्व जबाबामध्ये गंभीर विसंगती आहेत आणि तो विश्वासार्ह नाही. तसेच, आरोपी अनेक दिवसांपासून कारागृहात असल्याने जामीन मिळण्यास पात्र आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून खंडपीठाने आरोपी संतोष साबळेला जामीन मंजूर केला. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. जयदीप माने तर सरकारतर्फे ॲड. एस. एन. देशमुख यांनी काम पाहिले.








