सिंहगड कॉलेज प्राणघातक हल्ला प्रकरणी संजय उपाडे यास जामीन मंजूर
सोलापूर – पुणे-सोलापूर महामार्गावरील सिंहगड कॉलेजच्या आवारात घडलेल्या प्राणघातक हल्ला व विनयभंग प्रकरणातील मुख्य आरोपी संजय उर्फ संजीव नागनाथ उपाडे (रा. बाळे, ता. उत्तर सोलापूर) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. केंद्रे यांनी जामीन मंजूर केला आहे.ही घटना ३.३० वाजता घडली होती. फिर्यादी दत्तात्रय ईश्वर नवले हे हॉस्टेलसमोर थांबलेले असताना आरोपी उपाडे याने “कॅन्टीन बंद कर” अशी धमकी देत गळ्यावर चाकू लावला.

आरडाओरड ऐकून मदतीला आलेल्या कर्मचारी प्रकाश माळी यांच्या पोटात चाकू खुपसल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात प्रकाश माळी गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपी व अन्य साथीदार क्रुझरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कॉलेज कर्मचाऱ्यांनी संजय उपाडे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

फौजदार चावडी पोलिस ठाण्यात संजय उपाडे, श्रीकांत माणिक वाघमारे, रोहित सुभाष मंडलिक, अमोघ अरुण कुलकर्णी, दीपक दगडू गरड, सोमेश्वर शशिकांत झाडपिडे, शुभम विष्णु भोईटे, रोहित बाळासाहेब वाडेकर (सर्व रा. बाळे, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
न्यायालयीन सुनावणीत आरोपीच्या बाजूने अॅड. संतोष न्हावकर यांनी “घटनेवेळी आरोपीस झालेल्या जखमा लपविण्यात आल्या, फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आहे, तसेच जप्त चाकूवर रक्ताचे डाग नसल्यामुळे प्रकरण संशयास्पद आहे” असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने उपाडे यास जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रुपनर, अॅड. वैशाली गुप्ता, अॅड. मानसी बिराजदार यांनी काम पाहिले, तर सरकारी पक्षातर्फे अॅड. अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.








