सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार आणि लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी एजाज हुसेन मुजावर यांचे थोड्याच वेळापूर्वी दुःखद निधन झाले.
एजाज मुजावर हे अभ्यासू, व्यासंगी आणि निस्पृह भूमिकेतून पत्रकारिता करणारे धाडसी पत्रकार म्हणून ओळखले जात. संचार या स्थानिक दैनिकातून त्यांनी पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. स्वर्गीय रंगाअण्णा वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पत्रकारितेचे मर्म आत्मसात केले. मागील ३८ वर्षांचा त्यांचा दीर्घ, समृद्ध आणि अनुभवी पत्रकारितेचा प्रवास आज समाप्त झाला.सोलापूर शहरातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर त्यांची अचूक, तपशीलवार माहिती होती.

शहर आणि जिल्ह्यातील घटनाक्रम समजून घेण्यासाठी संदर्भग्रंथ म्हणूनच अनेक जण त्यांचा आधार घेत असत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा दुवा होता, तर नवोदित पत्रकारांना दिशादर्शक म्हणून ते सदैव उपलब्ध राहत.गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडू लागली. विस्मृतीचा त्रास वाढू लागल्याने वैद्यकीय तपासणीत मेंदूवर गाठ असल्याचे निष्पन्न झाले. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून काही काळ आराम मिळाला. मात्र प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांना सोलापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आज गुरुवारी सकाळी ९.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.सोलापूर पत्रकारितेतील एक मार्गदर्शक, निस्पृह आणि तटस्थ आवाज हरपल्याची भावना पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.








