सोलापूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन वा ऑफलाईन उत्सव परवाना बाबत काहीच हालचाल दिसून येत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेड च्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना भेटून उत्सव परवाना तातडीने देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा संभाजी ब्रिगेड च्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साह मध्ये साजरी करण्यात येते. सोलापूर शहरातील विविध मंडळाचे वतीने भव्य दिव्य प्रमाणात शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. शिवजन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नागरिक सोलापूरमध्ये येत असतात सोलापूर शहरांमध्ये शिवजन्मोत्सव स्थापना 14 तारखेपासून ते 19 फेब्रुवारी विसर्जन मिरवणूक अशा पद्धतीने विविध मंडळे शिवजन्मोत्सव साजरा करतात.
एवढा मोठा उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे तरी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित केली नाही. ती बैठक तात्काळ आयोजित करावी व या बैठकीची माहिती विविध वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्ध देण्यात यावी. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शांतता कमिटी बैठकीनंतर दोन-तीन दिवसांनी ऑनलाईन उत्सव परवाना देण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे अत्यंत कमी वेळेअभावी शिवजन्मोत्सव मंडळ यांना धावपळ करावी लागते. कधी कधी पोलीस प्रशासन व कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण होतो. सोलापूर शहर शांतता कमिटीची बैठक तातडीने घेण्यात येऊन शिवजन्मोत्सव उत्सव परवाना तातडीने देण्यात यावे ही मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले ,कार्याध्यक्ष अरविंद शेळके, रमेश चव्हाण ,ओंकार कदम, राजेंद्र माने, अजित पाटील, बाबासाहेब ननवरे, रूपेश किरसावंरगी, विजय बिल्लेगुरू आदी उपस्थित होते.