mh 13 news network
सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला केवळ एक किल्ला नसून महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह आहे, सोनेरी पान आहे. जुन्नर शहराच्या उत्तरेला उभा असलेला हा गड जणू त्या भूमीचा रक्षक बनून शतकानुशतके उभा आहे. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक कडा, प्रत्येक तट इतिहासाची गाथा सांगतो.

इ.स. सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. सुरुवातीला हा किल्ला एक महत्त्वाचे लष्करी ठाणे म्हणून उभारण्यात आला होता. अनेक राजवटींनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व गाजवले. मात्र, भोसले घराण्याच्या काळात याला खऱ्या अर्थाने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
१५९५ मध्ये मालोजीराजे भोसले यांच्या ताब्यात हा गड आला. याच ठिकाणी, १९ फेब्रुवारी १६३० रोजी, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. या किल्ल्याच्या साक्षीने त्यांचे बालपण घडले. ज्या किल्ल्यावर एका युगपुरुषाने पहिला श्वास घेतला, तो किल्ला स्वाभाविकच असामान्य तेज आणि पावित्र्य लाभलेला ठरतो. बालवयातच त्यांनी राज्यकारभार, युद्धकला आणि मुत्सद्देगिरीचे धडे येथेच गिरवले.

शिवनेरीचा निसर्गसंपन्न परिसर, मजबूत तटबंदी आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केलेली रचना पाहिल्यास शहाजी राजांनी हा किल्ला निवडण्यामागचे महत्त्व लक्षात येते. शिवनेरीवर झालेल्या संस्कारांमुळेच शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली.
शिवनेरीचे महत्त्व केवळ त्याच्या संरक्षणात्मक रचनेत नाही तर त्याच्या सामरिक स्थानातही दडलेले आहे. नाणेघाट आणि माळशेज घाट या प्राचीन व्यापारी मार्गांवर नजर ठेवणाऱ्या या किल्ल्यामुळे येथील सत्ताधाऱ्यांना व्यापारावर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होत असे. सातवाहनांच्या काळापासून या घाटखिंडी पश्चिम किनाऱ्यावरील समृद्ध बंदरांना देशाच्या आतील प्रदेशाशी जोडत होत्या. त्यामुळे या परिसरावर नियंत्रण म्हणजे व्यापार, सत्ता आणि सामरिक बळ या तिन्ही गोष्टींवर पकड मिळविणे होय. म्हणूनच, पुढे कुठलाही राजवंश आला तरी शिवनेरीवर नियंत्रण मिळवणे हे त्यांच्यासाठी अनिवार्यच होते.
शिवनेरीची रचना ही युद्धकौशल्याचे अद्वितीय उदाहरण आहे. डोंगरकड्यांचे नैसर्गिक बळ आणि त्याला जोडलेली भक्कम चिरेबंदी, तटबंदी यामुळे हा किल्ला जवळपास अभेद्यच मानला जात असे. साधारणपणे साडेतीन हजार फूट उंचीवर वसलेल्या या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात दरवाजांमधून जावे लागते. हे दरवाजे वळणदार व गुंतागुंतीच्या पद्धतीने बांधलेले असल्यामुळे शत्रू गोंधळून जाई, त्याचा वेग मंदावला जाई आणि मग गडावरून हल्ला चढविणे सोपे होई.
किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर एक विस्तीर्ण पठार दिसते. त्यात निवासासाठी घरे, धान्यसाठ्याची कोठारे, तसेच प्रस्तरात खोदलेली पाण्याची मोठी टाकी आहेत. उन्हाळ्यातील उष्णतेत किंवा शत्रूच्या दीर्घकाळ चालणाऱ्या वेढ्यातही या पाणीसाठ्यामुळे गडाची स्वायत्तता टिकून राहायची. किल्ल्याच्या उत्तरेला ‘कडेलोट’ नावाचा उग्र कडा आहे, जिथून शत्रूंना खाली फेकले जात असे. किल्ल्याच्या आत शिवाई देवीचे मंदिर आहे. शिवनेरी हा केवळ सैन्यदृष्ट्या महत्त्वाचा गड नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही पूज्य मानला जातो.
आजही शिवनेरी महाराष्ट्राच्या लोकमानसात अपार आदराचे स्थान राखतो. दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हजारो शिवभक्त, शाळकरी मुले, इतिहासप्रेमी व पर्यटक या दिवशी गडावर एकत्र येतात. शिवनेरीचा गगनभेदी निनाद त्यांना धैर्य, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांनी प्रेरित करतो.
शिवनेरी किल्ल्याचा प्रवास केवळ ऐतिहासिक सफर नसून, त्याच्या आसपासच्या परिसरात अनेक अद्भुत ठिकाणे आहेत. इथे इतिहास, अध्यात्म आणि निसर्गसौंदर्य यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. किल्ल्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर लेण्याद्रीची लेणी आहेत. या प्राचीन बौद्ध लेणी उत्कृष्ट शिल्पकलेचे दर्शन घडवतात. याच गुहांमध्ये असलेले गिरीजात्मज मंदिर अष्टविनायकांपैकी एक असून, गणेशभक्तांसाठी हे पवित्र स्थळ आहे. गुहांपर्यंतच्या चढाई दरम्यान दिसणारे विस्तीर्ण निसर्गदृश्य मन मोहून टाकते.
शिवनेरीपासून दहा किलोमीटरवरील ओझर आणि गिरीजात्मज गणपती मंदिरे भक्तांसाठी विशेष आकर्षण आहेत. विघ्नहर गणेशाला समर्पित असलेले ओझर मंदिर देखण्या वास्तू कलेसाठी प्रसिद्ध आहे. इथले शांत आणि भक्तिमय वातावरण प्रार्थनेसाठी पोषक आहे. निसर्ग प्रेमींसाठी माळशेज घाट हे रमणीय स्थळ शिवनेरीपासून तीस किलोमीटरवर आहे. धुक्याने वेढलेले डोंगर, धबधबे आणि जैव विविधतेने नटलेला परिसर इथे पाहायला मिळतो. पावसाळ्यात तर हा संपूर्ण प्रदेश हिरव्यागार शालूत नटतो. साहस प्रेमींनी नाणेघाटाला भेट द्यायलाचं हवी. हा प्राचीन व्यापारी मार्ग आणि ट्रेकिंगचे प्रसिद्ध ठिकाण ३५ किलोमीटरवर आहे. इथल्या कोरीव शिला लेखांमधून शतकांपूर्वीच्या व्यापाऱ्यांच्या आठवणी जपल्या गेल्या आहेत. नाणेघाटातून सह्याद्री पर्वतरांगांचे विस्मयकारक दृश्य दिसते. केवळ सहा किलोमीटरवर जुन्नरची लेणी आहेत. दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेल्या या बौद्ध लेण्यांमध्ये चैत्यगृह आणि विहारांचा समावेश आहे. कोरीव नक्षीकाम, प्राचीन काळातील भिक्षूंचे वास्तव्य आणि शिल्पकला यामुळे हे ठिकाण विशेष आहे. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाफ असलेल्या शिवनेरी आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिकाणांना भेट देण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आला असून, शिवनेरीलाही त्या सन्माननीय श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे शिवनेरीला जागतिक स्तरावरही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून विशेष ओळख प्राप्त झाली आहे.
खरे तर, शिवनेरी हा केवळ दगड आणि मातीचा किल्ला नाही तर तो धैर्याचा स्रोत, चारित्र्याचा आधार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. शिवनेरी किल्ला हा केवळ ऐतिहासिक वारसा नसून महाराष्ट्राच्या अभिमान, शौर्य आणि परंपरेचे प्रतीक आहे. इतिहासप्रेमी, ट्रेकिंगसाठी उत्सुक किंवा संस्कृतीचा अभ्यास करणारे पर्यटक इथे एक अद्वितीय अनुभव घेऊ शकतात. किल्ल्याच्या भव्यतेचा अनुभव घेत असताना, त्या महान युगाचा साक्षीदार होण्याची संधी लाभते, ज्या काळाने भारताच्या भवितव्याला आकार दिला. इथल्या सुळक्यांवर उभे राहून सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगांचे सौंदर्य डोळ्यांत साठवता येते. शिवनेरीचा प्रत्येक दगड, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक वाट इतिहासाचे सोनेरी पान