MH 13News Network
संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटलेले आहे . राज्यात शांततेच्या मार्गाने आंदोलन पुढे जात असताना एका युवकाने ओबीसीतून आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील तेलगाव परिसरातील राजेश कानोडे या 22 वर्षीय युवकाने ओबीसीतून आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. मृत्युपूर्व एक चिठ्ठी लिहून त्याने आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलगाव येथील राजेश यांना त्यांच्या वडिलांच्या नावे चार एकर शेती आहे. या शेतीवर त्यांनी एका खाजगी बँकेचे 4 लाख रुपये व एका राष्ट्रीयकृत बँकेचे 2.50 लाख रुपये कर्ज घेतले होते. मागील काही वर्षात सतत होणाऱ्या नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता.
या शिवाय त्यांनी दोन वेळेस पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आरक्षण नसल्यामुळे त्यांना नोकरी मिळू शकली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतल होता. तर जिल्हयात मराठा आरक्षणासाठी झालेल्या सभा, बैठकांमधून त्यांनी स्वयंसेवक म्हणूनही काम केले आहे.
असा आहे चिठ्ठीतील मजकूर…!
“मी तेलगाव येथील रहिवाशी असून माझ्या कुटुंबावर बँकेच्या कर्जाचा बोजा आहे. माझे आई व वडील अपंग आहेत. सततच्या नापिकीमुळे मी बँकेचे कर्ज फेडू शकलो नाही. मी सुशिक्षित असून मी मराठा समाजाचा आहे. अनेक नोकरीसाठी प्रयत्न केले परंतु आरक्षणाअभावी मला कुठली नोकरी देखील मिळाली नाही. कर्ज व नोकरी न मिळाल्यामुळे मी माझ्या जीवनाला कंटाळलो आहे. या सरकारच्या आडमुठे धोरणामुळे मी माझे जीवन यात्रा संपवत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सतत धडपडणारे मनोज दादा जरांगे पाटील यांना विनंती आहे की, माझ्या आत्महत्येची दखल घेऊन मराठा समाजाला OBCतून आरक्षण मिळवून द्यावे”
अशी चिठ्ठी लिहून राजेश कानोडे याने आपली जीवन यात्रा संपविली.
दरम्यान, नापीकीमुळे कर्ज कसे फेडावे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने रामेश्वर हे मागील आठ ते दहा दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यानंतर शनिवारी ता. 8 रात्री शेता जात असल्याचे सांगून ते घरातून निघाले. त्यानंतर ते घरी परतले नाही. रविवारी ता. 9 सकाळी काही शेतकरी दुध काढण्यासाठी शेतात जात असतांना रामेश्वर यांचा मृतदेह शेतात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक संजय केंद्रे, जमादार महेश अवचार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत राजेश यांच्या खिशात मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमुद केलेली चिठ्ठी आढळून आली आहे. या प्रकरणी ईश्वर कानोडे यांनी दिलेल्या माहितीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. उपनिरीक्षक संजय केंद्रे पुढील तपास करीत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी मराठा तरुणांना आत्महत्येपासून दूर राहण्याचे आवाहन केलेले होते. तरीसुद्धा नैराश्यातून अनेक जणांनी आत्महत्या केलेली आहे.
मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन जेष्ठ समाज बांधवांनी केले आहे.