MH 13 News Network
शहरातील उत्तर सोलापुरातील बाळे भागात लोकमंगल नगर जवळ असलेल्या भाजी मंडई जवळील ड्रेनेज चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर जात असून त्या जवळच असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वॉलमध्ये दूषित पाणी मिसळले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. आज मंगळवारी सकाळी रस्त्यावर गटारगंगा वाहत होती. येथील नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत घेऊन जावे लागत होते.
लोकमंगल नगर जवळील भाजी मंडईच्या रस्त्यावर ड्रेनेज चेंबर फुटल्याने मोठ्या प्रमाणावर घाण पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांना अक्षरशः नाक मुठीत धरून जावे लागत आहे.

या जवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वॉलमध्ये दुर्गंधीयुक्त दूषित पाणी मिसळल्यामुळे गेल्या दोन दिवसांपूर्वी आलेल्या पाण्याला घाण वास येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने नागरिकांना गॅस्ट्रो तथा तत्सम आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर महापालिका प्रशासनाने ताबडतोब कार्यवाही करावी अशी मागणी समोर येत आहे.

एम एच 13 न्यूज च्या प्रतिनिधीने येथील रहिवाशांशी संवाद साधले असता या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळले गेल्यानेच काळया रंगाचे पाणी ‘पाण्याच्या दिवशी’ आले. या पाण्याला घाण वास येत होता. यामुळे लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्ती आजारी पडू शकतात अशी प्रतिक्रिया मिलिंद लोंढे, आकाश लाले, राजू मोटे, बाळासाहेब सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

हेड ऑफिसला कळविण्यात आले असून लवकरच काम पूर्ण होईल..!
भाजी मंडई जवळील ड्रेनेजचे चेंबर या ठिकाणी नवीन होत असलेल्या अपार्टमेंटच्या कामामुळे फुटले आहे. यामध्ये काँक्रीट पडले असल्यामुळे ड्रेनेज तुंबले आहे. याबाबतची माहिती महापालिकेच्या हेड ऑफिसला आणि झोन कार्यालयाला कळवली आहे. याआधी जेटिंग मशीनने पाणी सप्लाय होण्याचा प्रयत्न केला होता. आज अधिकाऱ्यांना पुन्हा कळवले आहे. ड्रेनेज मधील गाळ काढून चेंबर बांधण्याचे काम लवकर सुरू होईल.
गणेश पुजारी, माजी नगरसेवक