मुंबईतील 29 ऑगस्टच्या उपोषणासाठी शेकडोंच्या सहभागाचा निर्धार
दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या लढ्यास नवसंजीवनी देण्यासाठी ‘चलो मुंबई’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापुरातील वडजी येथे मराठा समाजाची पहिली चावडी बैठक रविवारी सायंकाळी उत्साहात आणि निर्धाराच्या वातावरणात पार पडली.
मारुती मंदिर प्रांगणात झालेल्या या बैठकीस सरपंच सीताराम कदम, माजी सरपंच गोटीराम चौगुले, संजय जाधव, सचिन तिकटे, सचिन साळुंखे यांच्यासह गावातील मान्यवर, पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सोलापुरातील सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी समाजाच्या हक्कांसाठी शांततापूर्ण पण ठाम पद्धतीने लढा देण्याचे आवाहन केले. “आपापसातील मतभेद विसरा, एकदिलाने चला आणि ‘चलो मुंबई’ला गगनभेदी घोषणांनी दुमदुमवा” असा संदेश त्यांनी दिला.
प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी स्वतःचा जीव पणाला लावणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे संपूर्ण समाजाने उभे राहणे हे आता काळाची गरज आहे.
राजकारण्यांच्या मागे लागून समाज अस्थिर झाला होता. परंतु आरक्षण आंदोलनामुळे समाज एकवटला असून 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जाण्यासाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर बैठका घेतल्या जात आहेत. यास पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिली बैठक ही वडजी गावात झाली त्यामुळे ग्रामस्थांची जबाबदारी वाढली आहे. समाजाने नेत्याला साथ द्या असे भावनिक आवाहन यावेळी माऊली पवार यांनी केले.
वडजी या गावात जवळपास 18 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. परंतु जात पडताळणी पूर्ण झाली नाही. अशी माहिती येथील ग्रामस्थांनी बैठकीत दिली. यावेळी लवकरच शासकीय दरबारी याचा पाठपुरावा केला जाईल असेही यावेळी पवार म्हणाले.

29 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे उपोषण आंदोलन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील ही पहिली बैठक ठरली. या बैठकीत वडजी गावातून शेकडोंच्या संख्येने मुंबई मोर्चात हजेरी लावण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला.

यानंतर लगेचच बक्षी हिप्परगा येथे महादेवाच्या मंदिरासमोर ग्रामस्थांची चावडी बैठक पार पडली. यावेळी या भागातील समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
बैठकीदरम्यान ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि गावात आंदोलनाची उर्मी अधिकच वाढली.