MH13NEWS Network
२६ मे रोजी विमानसेवा सुरू न झाल्यास होटगी रोड विमानतळाला प्रतिकात्मक ताळे ठोकणार
– सोलापूर विकास मंचाचा इशारा
सोलापूर, दि. 15 मे:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही नऊ महिने उलटले, तरीही होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावर नागरी विमानसेवा सुरू झालेली नाही. या बाबत सोलापूर विकास मंचच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, २६ मे रोजीही विमानसेवा सुरू न झाल्यास विमानतळाला प्रतिकात्मक ताळे लावण्याचा इशारा मंचाने दिला आहे.

हटके एसएमएस मोहीम…!
सोलापूर विकास मंचचे सदस्य म्हणाले की, “हे केवळ प्रशासनाचे अपयश नसून, पंतप्रधानांचा थेट अवमान आहे.” नागरी सेवा सामान्य जनतेसाठी सुरू होणे अपेक्षित होते, मात्र आजतागायत ती उपलब्ध न झाल्यामुळे सोलापूरकरांमध्ये तीव्र रोष आहे.मंचाने लोकप्रतिनिधींना गती मिळवून देण्यासाठी दबाव आणण्याचे ठरवले असून, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांना दररोज एस.एम.एस पाठवण्याची मोहिम राबवली जाणार आहे.

या बैठकीस मंचाचे मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर, अर्जुन रामगिर, श्रीकांत अंजुटगी, घनश्याम दायमा, रमेश माळवे, प्रसन्न नाझरे, जयश्री तासगावकर, सुहास भोसले, नरेंद्र भोसले, आनंद पाटील, वासुदेव आडके, भारत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी विमानसेवा लवकर सुरू होईल असे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता झाली नाही म्हणून आज गुरुवारी सायंकाळी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये सोलापूर विकास मंचची बैठक आयोजित करण्यात आली होती तेव्हा सर्वांनुमते हा निर्णय घेण्यात आला.