MH 13 News Network
दक्षिण सोलापुरातील काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांनी विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर समाजकार्य उभे केले आहे. त्या कार्याच्या जोरावर त्यांनी काँग्रेसकडे विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र ,आज कोगनुरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. रेल्वेचे इंजिन सोलापुरात धावणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
महादेव कोगनुरे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे विधानसभा उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केलेली आहे. अजूनही त्यांना सकारात्मक कौल मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. दक्षिणमधून काँग्रेसची मोठी फळी ही उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने नेमका कोणाला कौल द्यायचा असा प्रश्न काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना पडलेला आहे.
दरम्यान, एम के फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक गरजूंना रोजगार निर्माण करून देणारे सागर सिमेंटचे व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन नवे राजकीय संकेत दिले आहेत. महादेव कोगनुरे हे लिंगायत समाजाचे आहेत. दक्षिण सोलापूर मतदार संघात या समाजाची संख्या मोठी आहे. त्यातच सागर सिमेंटच्या माध्यमातून शेकडो युवकांना रोजगार मिळवून दिल्याने अनेक कुटुंबाशी त्यांचा थेट संपर्क आला आहे.
कौटुंबिक आर्थिक अडचणी, संकटात सापडलेल्या व्यक्तींसाठी कोगनूरे धावत जात असतात. एक सकारात्मक वातावरण तयार करण्यात एम के फाउंडेशन यशस्वी होत आहे.
आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची महादेव कोगनुरे आणि त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींनी भेट घेतल्याने दक्षिणच्या राजकारणात मनसेची इंट्री होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.काँग्रेसमधून उमेदवारी न मिळाल्यास कोगनूरे हे बंडखोरी करून मनसेच्या रेल्वे इंजिनसोबत जातील असे मत व्यक्त केले जात आहे.