MH 13 NEWS NETWORK
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि सहा संस्थांची अनोखी समाजसेवा
दक्षिण सोलापूर,
पत्रकारितेचा अर्थ फक्त बातम्या सांगणे नाही; तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणे आहे. याचे जिवंत उदाहरण ठरला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेतील “पाण्याचा झरा”.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शाळेच्या आवारात बोअरवेल मारण्यात आली. १३० फुटांवर लागलेल्या दोन इंच पाण्यामुळे शाळेला अखेर जीवनदायी आधार मिळाला आहे. या कार्यात बालमोहन विद्यामंदिर पालक विद्यार्थी उत्कर्ष समिती, जीएसबी टेंपल ट्रस्ट, संत गाडगेबाबा धर्मशाळा आणि पल्लवी फाऊंडेशन यांचाही मोलाचा सहभाग होता.
निधी संकलन, प्रत्यक्ष भेट, परिसराची पाहणी आणि शेवटी पाण्याची सोय; हा उपक्रम संवेदनशील पत्रकारितेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सर्वोत्तम संगम ठरला आहे.
कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी, राजेंद्र साळस्कर आणि काॅंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी उपस्थित होते. शाळेत बोअरवेलला लागलेले पाणी पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता. पाणी पाहून विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानात एकच जल्लोष केला. ग्राम शाळा समिती, शाळेच्या मुख्याधिपिका आणि सर्व शिक्षकांनी या कार्यात सहभागी संस्थांचे आभार मानले.









