mg 13 news network
सोलापूर – ब्राह्मण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना निवेदन दिले.
या निवेदनात ब्राह्मण समाजातील तरुणांना तातडीने कर्जवाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तरुणांच्या उद्योग व्यवसायासाठी १५ लाखांहून अधिक आर्थिक तरतूद व्हावी आणि सामूहिक उद्योगांसाठी ५० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी शिफारसही केली आहे. महामंडळाचे आर्थिक बजेट वाढवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मदतीचा लाभ मिळावा, अशीही मागणी या निवेदनात नमूद आहे.
महामंडळाविषयी समाजातील तरुणांमध्ये अधिक माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृती आणि सुसंगत उपाययोजना राबवण्याची गरजही या निवेदनातून अधोरेखित करण्यात आली.
यावेळी भाजपचे सरचिटणीस शेखर फंड आणि रोहित तडवळकर यांचीही उपस्थिती होती. या निवेदनाबाबत माहिती देताना महेश कुलकर्णी म्हणाले की, “ब्राह्मण समाजातील अनेक तरुणांकडे कौशल्य आहे, मात्र आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उद्योगांमध्ये यश मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे महामंडळामार्फत त्यांना भक्कम आधार मिळणे गरजेचे आहे.”