MH 13 News Network
पश्चिम महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यामधील शांतता रॅलीची सोलापुरातून होणार सुरुवात…
जरांगे – पाटलांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सात ऑगस्ट रोजी होणार भव्य सभा…
मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीसाठी लाखों वादळ घोंगावणार
दुसऱ्या टप्प्याची तयारी पूर्ण.
२००० मराठा स्वयंसेवकांची व्यवस्था…
पाच ठिकाणी मेडिकल केंद्र…
चारी दिशांना असणार ऍम्ब्युलन्स..
पुणे नाका, देगाव रोड, रेल्वे स्टेशन, सात रस्ता परिसरात पार्किंग…
गेल्या पाच वर्षापासून मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे आंदोलने करण्यात आली .मात्र आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला नव्हता. गतवर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा विषय हाती घेतल्यामुळे या आरक्षणावरती ठोस निर्णय होण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात सोलापूर सारख्या हुतात्म्याच्या नगरीतून केली जाणार असल्याने या आरक्षणाला यश नक्कीच मिळेल असा विश्वास सोलापूरकरांमधून व्यक्त केला जात आहे.
बुधवार दिनांक ७ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने देण्यात आली. यावेळी अमोल शिंदे ,रवी मोहिते, दास शेळके, प्रताप चव्हाण, श्रीकांत घाडगे, बाळासाहेब गायकवाड ,दिलीप कोल्हे, अनंत जाधव, हेमंत चौधरी, शेखर फंड, आदीसह मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते.
आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता .या शांतता रॅलीची दुसऱ्या टप्प्यातील सुरुवात सोलापूर जिल्ह्यामधून केली जात आहे .
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधूनच आरक्षण मिळायला हवे. आणि सगे सोयऱ्यांचा प्रश्नही निकाली काढण्यात यावा या मागण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातून सात ऑगस्ट रोजी करण्यात येत आहे.
अशी आहे पार्किंगची व्यवस्था..
सोलापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या पुणे नाका येथून येणारी वाहने अवंती नगर रस्त्यावरती दुतर्फा व बसवंती पार्किंग, रूपा भवानी रोड, महामार्गाचा सर्विस रोड येथे पार्क करण्यात येणार आहेत.
बार्शी ,मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यामधून येणाऱ्या वाहनांना वरील पार्किंगची व्यवस्था देण्यात आली आहे.
तुळजापूर रोड वरून येणारी वाहने जव्हार मळा येथील पार्किंग मध्ये ठेवण्यात येणार आहेत.
तर मंगळवेढा रोड वरून येणारी वाहने जुनी मिल कंपाऊंड, एक्जीबिशन सेंटर (एकूण आठ एकर क्षेत्र) सीएनएस हॉस्पिटल समोरील बंद रस्ता येथे पार्क करण्यात येतील.
अक्कलकोट ,विजयपूर रोड वरून येणारी वाहने होम मैदानावर, सात रस्ता परिसर येथे पार्क करण्यात येतील.
आपत्कालीन दोन रुग्णालय..!
जरांगे पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आपत्कालीन दोन रुग्णालय उभारण्यात आली आहेत. सभेच्या चारी बाजूला ॲम्बुलन्स ठेवण्यात येईल येणार आहेत. पार्किंगच्या ठिकाणी मार्गदर्शनासाठी 2000 स्वयंसेवकाची व्यवस्था करण्यात आली आहे. ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा देण्यात आली आहे. २०१६ च्या मोर्चापेक्षा मोठ्या रॅलीचे नियोजन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाजी चौकामधील जेवढे लॉजेस, हॉटेल्स आहेत तिथे महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला येणाऱ्या नागरिकांना अन्नाचे पाकीट व पाण्याच्या बॉटल मोफत वाटप करण्यात येणार आहेत मराठा समाजाच्या ५८ शांतता मोर्चाची निवेदन ज्याप्रमाणे केवळ लहान मुलींच्या हस्ते देण्यात आले होते. त्याचप्रमाणे बुधवारच्या शांतता रॅलीत ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याऐवजी शेतकऱ्यांच्या मुलीच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
सभेच्या वेळी विचारपीठावरही फक्त मनोज जरांगे पाटील हे एकटेच असणार आहेत.
पोलीस प्रशासनाने जरांगे पाटील यांच्या बंदोबस्तासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
सकाळच्या सत्रामध्ये म्हणून जरांगे पाटील यांचे धाराशिव जिल्ह्यांमधील तुळजापूर येथून आगमन होणार असून सोलापूर ग्रामीण हद्दीत प्रवेश केल्यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडून रस्त्यावर पोलीस बंदोबस्त नेमला जाणार आहे. त्यानंतर पोलीस शहरातील रॅली आटपून ते कामती मार्गे मंगळवेढ्याला जाणार आहेत .त्यावेळी ग्रामीण पोलिसांचा रोड बंदोबस्त नेमलेला असणार आहे. तुळजापूर वरून जरांगे पाटील यांचे धर्मवीर संभाजी राजे चौकामध्ये आगमन होणार असून तेथून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभास्थळी दाखल होणार आहेत.
अकरा तालुक्यातील लाखो मराठा बांधव ..
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील शांतता रॅलीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा, करमाळा,माळशिरस,मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर ,उत्तर सोलापूर या अकरा तालुक्यामधून किमान दहा ते अकरा लाख मराठा बांधव या सभेसाठी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
२०० स्पीकरची व्यवस्था..
छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांचा आवाज छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ते नवी वेस पोलीस चौकी पर्यंत, बाळवेस रस्ता, बुधवार पेठ रस्ता अशा मार्गावरती 200 स्पीकर लावण्यात येणार आहेत .जेणेकरून सर्वांना मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आवाज ऐकता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.