mh 13 news network
सोलापूर: कौटुंबिक कलह आणि तणावातून सोलापुरातील एका 32 वर्षीय युवा वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी घडली आहे. मृत वकिलाचे नाव सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय 32, रा. समर्थ सोसायटी, एसआरपी कॅम्प, सोलापूर) असे आहे.
आत्महत्येपूर्वी सागरने लिहिलेली सुसाईड नोट त्याच्या बनियनमध्ये पोलिसांना मिळाली असून, त्यात आईवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
नेमके काय घडले?
वकील सागर मंदुरकर हे पत्नीसोबतच्या वादामुळे आणि इतर कौटुंबिक कारणांमुळे तणावाखाली होते. त्यांना दोन मुले आहेत.
मंगळवारी रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा सागर आणि त्यांची आई यांच्यात वाद झाला. त्यानंतर सागर वरच्या मजल्यावरील खोलीत झोपायला गेला, तर आई-वडील खालच्या मजल्यावर झोपले.
दुसऱ्या दिवशी वडील नेहमीप्रमाणे नोकरीवर गेले. दुपारी 4 वाजेपर्यंत सागर खाली आला नसल्याने आईला शंका आली.
आईने तातडीने आपल्या भावाला (सागरच्या मामाला) बोलावून घेतले.
आई आणि मामा यांनी वरच्या खोलीचा दरवाजा उघडला असता, सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
उपचारापूर्वीच मृत्यू…
सागरला तातडीने खाली उतरवण्यात आले आणि विजापूर नाका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, रात्री उशीर झाल्याने आज (गुरुवार, 13 नोव्हेंबर) पोस्टमार्टम केले जाणार आहे.
सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता, सागरच्या टी-शर्टच्या आतील बनियनमध्ये एक सुसाईड नोट सापडली. पोलिसांना ती मिळावी या उद्देशाने त्याने ती त्या ठिकाणी ठेवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिठ्ठीत सागरने म्हटले आहे की,
“माझी आई मला व माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती. मुलीला मात्र वेगळी वागणूक द्यायची. ती सतत मला अपमानास्पद वागणूक देत होती. तिला कठोर शिक्षा व्हावी.”
या सुसाईड नोटमुळे कौटुंबिक छळाचे कारण समोर आले आहे. विजापूर नाका पोलीस अधिक तपास करत आहेत.









