mh 13 news network
प्रभाग १६ व २० मध्ये पदयात्रा; खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती
सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोलापूर दौऱ्यावर येत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप लोकशाहीचा गळा घोटत असून “पैसा फेका, तमाशा दाखवा आणि निवडणूक जिंका” हेच त्यांचे सध्याचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला.
महापालिका निवडणूक ही शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासाच्या मुद्द्यांवर होणे अपेक्षित असते. मात्र सत्ताधारी विकासावर बोलण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करत असल्याचे सपकाळ म्हणाले. पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, उद्याने, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यांसारखे नागरिकांचे दैनंदिन प्रश्न बाजूला सारले जात असल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसने सत्तेचे विकेंद्रीकरण करून लोकशाही मूल्ये जपली, असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांवर टीका; ‘बुलडोझर राजकारणाचा’ आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले की, अहंकारातून बुलडोझरचे राजकारण करत सत्ता, पैसा आणि शासकीय यंत्रणा वापरून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सोलापूर, अकोट आणि खोपोली येथे निवडणूक प्रक्रियेदरम्यान घडलेल्या हत्यांच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी चिंता व्यक्त केली. भाजपकडून गुन्हेगारी, भ्रष्टाचार तसेच महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांतील व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचे आरोप करत हे राजकारण भयावह असल्याचे ते म्हणाले.
स्मार्ट सिटी दाव्यांवर प्रश्नचिन्ह
सोलापूर स्मार्ट सिटीच्या दाव्यांवरही सपकाळ यांनी टीका केली. “दुर्बिणीतूनही सोलापूरचा स्मार्टपणा दिसत नाही. प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे,” असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या जुन्याच आश्वासनांवर त्यांनी उपरोधिक टीका केली. पाणीटंचाई, खराब रस्ते, कामगारांसाठी योजना, उद्योगवाढ, बोरामणी विमानतळ आदी प्रश्नांवर गेल्या दहा वर्षांत ठोस काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
#लाडकी बहीण योजना : समर्थन, पण आचारसंहितेवर प्रश्न..
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेस या योजनेच्या विरोधात नाही. मात्र निवडणुकीआधी निधी रोखून ठेवून मतदानाच्या तोंडावर रक्कम देणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. काँग्रेस या योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची मागणी करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
#पदयात्रेत हजारोंचा सहभाग
यानंतर सपकाळ यांनी काँग्रेस–महाविकास आघाडीच्या प्रभाग १६ मधील उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत सहभाग घेतला. या पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह हजारो नागरिक व मतदार सहभागी झाले होते.
श्री सिद्धेश्वर दर्शन व सत्कार..
ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सपकाळ यांनी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले. पंचकमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, काँग्रेस प्रवक्ते अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी अध्यक्षा हेमाताई चिंचोलकर, उदय चाकोते, अॅड. केशव इंगळे, तिरुपती परकीपंडला, राहुल वर्धा, सुरेश हावळे, पशुपति माशाळ, शकील मौलवी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








