MH13NEWS
सोलापूर – (प्रतिनिधी)प्रभाग क्रमांक ६ मधील बल्लारी चाळीतील घरे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश दिले जातील, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप उमेदवार व पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्या विनंतीवरून त्यांनी बल्लारी चाळ येथील बसवेश्वर हौसिंग सोसायटीला भेट देत रहिवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या.

सोमवारी सायंकाळी पालकमंत्री गोरे हे प्रभाग सहा मधील भाजप उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, सोनाली गायकवाड व मृणमयी गवळी यांच्या प्रचारासाठी प्रभागात आले होते. यावेळी बल्लारी चाळीतील नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातबारा उताऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधत, याबाबत ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली.रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री गोरे यांनी जागेवरच निर्णयात्मक भूमिका घेतली. “हा प्रश्न आता फाईलमध्ये नाही, अंमलबजावणीत जाणार,” असा स्पष्ट शब्द त्यांनी गणेश वानकर यांच्या साक्षीने उपस्थित नागरिकांना दिला.
सातबारा उताऱ्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले जातील, असे त्यांनी सांगितले.पालकमंत्र्यांच्या या ग्वाहीनंतर बल्लारी चाळीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आणि त्यांना भरघोस मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली.
यावेळी पालकमंत्री गोरे यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता भाजपच्या सर्व उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी मनोज पवार, श्रीनिवास नाईकवाडी, महेश चव्हाण, शिवानंद उद्धव, दत्तू उद्धव, स्वाती शितल, भानुदास कवडे, नासिर शेख, आबा नरळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








