गळुरूच्या मातीत घुमली महाराष्ट्राची सिंहगर्जना
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा
बेंगळुरू गंजूरच्या मैदानावर मराठी खेळाडूंनी जणू वीज कोसळवली! भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने कर्नाटक खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित ४४ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी आक्रमक, चपळ आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत उपांत्यपूर्व फेरीत दणदणीत प्रवेश केला. चित्त्याच्या चपळाईसह खेळलेले हे सामने पाहून संपूर्ण देशाचे लक्ष आता मराठी वाघांकडे खिळले आहे.
महाराष्ट्राची विजयाची वारी; ओडिशावर दहा गुणांची मात
कुमार गटात महाराष्ट्राने ओडिशावर ३४–२४ असा दहा गुणांनी विजय मिळवला. मध्यांतराला २४–१० अशी भक्कम आघाडी घेत महाराष्ट्राने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने वळवला. महाराष्ट्राच्या जितेंद्र वसावे (२.२० व नाबाद १.१० मि. संरक्षण), सोत्या वळवी (२.१०, १.४० मि. संरक्षण, ४ गुण), हारदया वसावे (२.००, १.५० मि. संरक्षण, ४ गुण) व राज जाधव (१.५० मि. संरक्षण, २ गुण) यांनी विजयात निर्णायक भूमिका बजावली. ओडिशाकडून समीरने (८ गुण) व कुना बी. (१.२० मि., ४ गुण) यांची झुंज अपुरी ठरली.
महाराष्ट्राच्या रणरागिणींचा हरियाणावर प्रचंड विजय
महाराष्ट्राच्या मुलींनी हरियाणाचा ४७–१० असा पराभव करत एक डाव व तब्बल ३७ गुणांनी सामना जिंकला. महाराष्ट्राच्या श्रावणी तामखाडे (नाबाद ३.१० मि. संरक्षण), सानिका चाफे (३.२० मि. संरक्षण व २ गुण), मैथिली पवार (३ मि. संरक्षण व ४ गुण) व लामकाणे स्नेहा (२.५०, २.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी सामना एकतर्फी केला. पराभूत हरियाणाकडून अमन्ना व आंचल (प्रत्येकी ४ गुण) यांचा प्रतिकार निष्फळ ठरला.
कोल्हापुरी तडाखा; उत्तर प्रदेशवर एक डाव व दहा गुणांनी विजय
कुमार गटात कोल्हापूरने उत्तर प्रदेशला २८–१८ असे पराभूत करत एक डाव व दहा गुणांनी सामना जिंकला. कोल्हापूरच्या योगेश मंचीकातला (३.२६ मि. संरक्षण), सिद्धेश माने (१.३५, नाबाद १.५० मि. संरक्षण) व प्रेम देशमाने (१.२० मि. संरक्षण व ८ गुण) यांनी मैदान गाजवले. उत्तर प्रदेशकडून निकेश (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) व बित्तू कुमार (१.०० मि. संरक्षण व २ गुण) यांनी प्रतिकार केला.
विदर्भाची विजयी चमक; राजस्थानवर मुलींचा दबदबा
मुलींच्या गटात विदर्भाने राजस्थानवर ८ गुणांनी विजय मिळवला. मध्यांतराला २३–८ अशी मोठी आघाडी घेत विदर्भाने सामना खिशात घातला. विदर्भाच्या श्रद्धा एन. (२.४६ मि. संरक्षण व ६ गुण), कमल एम. (२.३०, २.५० मि. संरक्षण व ६ गुण) व ईश्वरी बी. (१.४० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. पराभूत राजस्थानकडून रक्षीम (१२ गुण), दीपांशी (१ मि. संरक्षण), कोमल व आरती (प्रत्येकी १.३० मि. संरक्षण) यांनी लढत दिली.
कोल्हापूरच्या मुलींची बंगालवर एक डाव राखून मात
मुलींच्या गटात कोल्हापूरने पश्चिम बंगालवर १३ गुण व एका डावाने विजय मिळवला. कोल्हापूरच्या श्रावणी पाटील (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) व निलम हरिजन (२ मि. संरक्षण व २ गुण) यांनी चमकदार खेळ केला. तर पराभूत बंगालकडून अमृता दास (१.२६ मि. संरक्षण) हिची झुंज अपुरी पडली.
इतर संक्षिप्त निकाल – कुमार गट
इतर संक्षिप्त निकाल:
कुमार गट : १) मध्य भारताने राजस्थानवर २७-१८ असा ९ गुण आणि एक डाव राखून विजयी झाला त्यांच्या रेहान खानने १० गुण मिळवत उत्कृष्ट प्रदर्शन केले. २) आंध्र प्रदेशने गुजरातचा ३०-२६ असा ४ गुणांनी पराभव केला. आंध्रच्या महेश बाबूने ८ गुण मिळवले. ३) तामिळनाडूने छत्तीसगडवर ५४-२२ असा ३२ गुणांनी विजयी मिळवला. तामिळनाडूच्या स्वराज एस. ने १० गुणांची नोंद केली. ४) यजमान कर्नाटकने दिल्लीचा ३७-८ असा २९ गुण आणि एका डावाने पराभव केला. कर्नाटकच्या पुनिथाने १० गुण वसूल केले. ५) केरळने पंजाबवर ३०-२४ असा ६ गुणांनी विजय संपादन केला. केरळच्या हाशीरने २.२५ मि. संरक्षण केले. ६) पश्चिम बंगालने विदर्भाचा ३८-२९ असा ९ गुणांनी पराभव केला. पश्चिम बंगालच्या अतनू दासने ३.१५ मि. संरक्षण करून ६ गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला.
मुली गट : १) कर्नाटकने छत्तीसगडवर ३३-२० असा १३ गुण आणि एका डावाने विजय साजरा केला. कर्नाटकच्या अपूर्वा आर. ने ८ गुण मिळवत उत्कृष्ट प्रदर्शन केले. २) तामिळनाडूने उत्तर प्रदेशवर २४-१६ असा ८ गुणांनी पराभव केला. तामिळनाडू अक्षराने ४ मि. संरक्षण करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.








