सोलापूर, दि. २२ सप्टेंबर –धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात २४ सप्टेंबर रोजी सोलापूरात काढण्यात येणारा सकल हिंदू समाजाचा मोर्चा व सभा रद्द करण्यात आली आहे.भोंग्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने या मोर्चाचे आयोजन केले होते.

या मोर्चात सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार गोपीचंद पडळकर तसेच ज्येष्ठ भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या भाषणांचे आयोजन कन्ना चौक येथे करण्यात आले होते.
मोर्चा मल्लिकार्जुन मंदिर (बाळीवेस) – टिळक चौक – मधला मारुती चौक – कन्ना चौक येथे जाणार होता.
मात्र आयोजकांनी परवानगी मागितल्यानंतर पोलिस आयुक्तांनी बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम २००० मधील तरतुदींनुसार माहिती दिली. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविषयी पोलीसांकडून सुरू असलेली कारवाई पुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा मोर्चा आयोजित करणे उचित नसल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त करत मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
२४ सप्टेंबर रोजी कोणीही मोर्चा किंवा सभेसाठी जमू नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले असून, याबाबतची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी प्रसारमाध्यमांना दिली.