राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधताना केले प्रतिपादन
कोल्हापूर समाजात शासन, प्रशासन, नागरिक अनेक प्रकारे कामे, विकास कामे करीत असतात. अशावेळी बदल हे चांगल्याप्रकारे पेरले, रूजविले जाणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर येथे केले. ते म्हणाले, कोणत्याही विकास कामांचे नियोजन चांगल्याप्रकारेच केले जाते. उदा. रस्ते करताना, उद्योग उभारताना, योजनांची अंमलबजावणी करीत असताना प्रत्येक काम बदल म्हणून केले जाते. ते काम चांगल्या प्रकारे व्हावे, ते बदल लोकांना स्विकारहार्य असावेत. असे बदल प्रशासनाकडून चांगल्याप्रकारे पेरण्याची गरज आहे. दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी सर्वांनी विशेष लक्ष देण्याची गरज असते. राज्यपाल यांनी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील डॉक्टर, वकील, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती, शेती, कला, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, राजकीय व माध्यम अशा विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेटी घेवून चर्चा केली. यावेळी त्यांनी सुरूवातीला जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेवून जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी टी शिर्के उपस्थित होते.
राज्यपाल महोदयांच्या आगमनावेळी पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली तसेच राष्ट्रगीत वादन करण्यात आले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा सखोल आढावा सुरूवातीला घेतल्यानंतर विविध क्षेत्रातील शिष्ट मंडळांशी त्या त्या गटनिहाय चर्चा केली. यावेळी उपस्थित शिष्ट मंडळातील सदस्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विकासासाठी आवश्यक कामांबाबतची चर्चा केली व निवेदने सादर केली. यात जिल्ह्यातील उद्योग वाढ, हद्दवाढ, सार्वजनिक आरोग्य सेवा, खंडपीठ, औद्योगिक विकास, रोजगार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण, शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतीसाठी पाणी, पर्यावरण संरक्षण, पूरावर कायमस्वरूपी तोडगा, गुळाचा वापर शालेय स्तरावर मध्यान्ह भोजनात करणे, आरक्षण आदी विषयावर मागण्या करण्यात आल्या तसेच त्यावर चर्चा झाली.
यावेळी हद्दवाढीवर बोलताना ते म्हणाले, शहरांची लोकसंख्या आणि वाढ आपण रोखू शकत नाही. हद्दवाढ काही काळ आपण थांबवू शकतो परंतू ती कायमस्वरूपी थांबविता येत नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी याबाबत नियोजन केल्यानूसार ते पुर्वीप्रमाणेच करण्याच्या सूचना दिल्या आसल्याचे सांगितले. तसेच त्यांनी मुलांसाठी गुळाचा वापर मध्यान्ह भोजनात साखरे ऐवजी करावा याबात सुचविलेल्या मुद्दयांवर याबाबत अधिक चर्चा करू असे आश्वासन दिले. रोजगारक्षम ग्राम संकल्पना, कौशल्य विकासावर भर अधिक चांगल्या प्रकारे सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपस्थित शिष्ट मंडळांतील सदस्यांनी राज्यपालांचे पुष्प देवून स्वागत केले. तसेच त्यांनी आजपर्यंत पहिल्यांदाच राज्यपालांनी प्रत्यक्ष जिल्हयात येवून संवाद साधल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. यावेळी राज्यपाल महोदयांनी स्थानिक पातळीवरील समस्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले.