MH13 NEWS Network
प्रज्ञावंतांच्या सहविचार सभेत विजयाचा निर्धार
सोलापूर, दि. 10- – सोलापूर दक्षिण विधानसभेची निवडणूक ही तुमच्या-माझ्या स्वाभिमानाची लढाई आहे. हा स्वाभिमान जपण्यासाठी ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल, असा निर्धार या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला.रविवारी, जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात आयोजित प्रज्ञावंतांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.
सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, अॅड. रा. गो. म्हेत्रस, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, श्री सिध्देश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, माजी नगरसेवक शिवलिंग कांबळे, उद्योजक रवी आडगी, माजी प्राचार्य के. एम. जमादार यावेळी उपस्थित होते.
अनेकांनी आपल्या भाषणातून काडादी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले.धर्मराज काडादी यांनी आपल्या भाषणातून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्नांची उकल केली. राज्यातील नाकर्ते सरकार आणि इथले निष्क्रिय आमदार यांच्यामुळेच हे प्रश्न सुटले नाहीत असेही ते म्हणाले. गेली दहा वर्षे लोकांनी ज्या अपेक्षेने भाजपला निवडून दिले, त्या अपेक्षा पूर्ण करण्यात आमदारांना अपयश आले आहे.
विकासाची कामे करण्याऐवजी त्यांनी सुडाचे राजकारण केले. व्यक्तिद्वेष करण्यातच आपली शक्ती वापरली. त्यामुळे मतदारसंघातील एकही प्रश्न सुटला नाही. विकासाची दृष्टी नसलेल्या अहंकारी आमदाराला आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला हे कर्तव्य पार पाडा, असे आवाहन त्यांनी केले.सोलापूर दक्षिण मतदारसंघातील विकासाची पूर्वपीठिका सांगताना काडादी म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी, वि. गु. शिवदारे, आनंदराव देवकते, बाबूराव चाकोते, कमळे गुरुजी, ब्रह्मदेव माने यांनी सार्वजनिक संस्था उभ्या केल्या. यामुळे दक्षिण सोलापूरचा विकास झाला.
सिध्देश्वर परिवाराच्या माध्यमातून या संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे. सिध्देश्वर कारखान्याचे आज तीस हजार सभासद आहेत. इथेनॉल, सहवीजनिर्मिती प्रकल्प उभे केले. गाळप क्षमता प्रतिदिन तीन हजारांवरुन दहा हजार केली. 38 मेगावॉट सहवीजनिर्मितीचा प्रकल्प केला. यामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढले. गेली तीन वर्षे इतरांच्या तुलनेत प्रतिटन चारशे रुपये जास्त दर दिला. यामुळे शेतकर्यांमध्ये विश्वास निर्माण झाला.महाराष्ट्रातील आदर्श कारखाना म्हणून ‘सिध्देश्वर’ने लौकिक प्राप्त केला.
सिध्देश्वर देवस्थानच्यावतीने अनेक लोकोपयोगी कामे केली. महिलांसाठी स्वतंत्र पॉलिटेक्निक तसेच इंजिनीअरिंग कॉलेज काढले आणि उत्तम चालू आहे. भक्तनिवास, सुवर्णसिध्देश्वर, दासोह, फिजिओ थेरपी सेंटर, हॉस्पिटल अशा संस्था वटवृक्षाप्रमाणे वाढल्या आहेत. सर्वांच्या सहकार्यातून हे शक्य झाले, अशी कृतज्ञतेची भावना काडादी यांनी व्यक्त केली. या मतदारसंघात ग्रामीण आणि शहरी भागाचा समावेश होतो. दोन्हीकडच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. गेली दहा वर्षे आमदारांनी फक्त आश्वासने दिली. प्रत्यक्षात काहीच केले नाही. शेतकर्यांचा पाण्याचा आणि विजेचा प्रश्न आहे. सिंचनाचा प्रश्न सुटला तर दक्षिण तालुक्यात हरित क्रांती होईल. शेतीमालावर आधारित उद्योग आणले तर रोजगाराचा प्रश्न दूर होईल, असेही ते म्हणाले.
सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी केवळ द्वेष आणि स्वार्थापोटी पाडली. स्वतःचा कारखाना चालावा यासाठी सिध्देश्वर कारखाना बंद पाडण्याचा कुटील डाव होता. विमानसेवेचे नाव पुढे करुन चिमणी पाडली. वर्ष उलटून गेले तरी विमानसेवा सुरु झाली नाही. 2007 मध्ये तत्कालीन शासनाने होटगी विमानतळाच्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता.
बोरामणी येथे मोठे विमानतळ सुरु करण्याची योजना आखली. त्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले. सरकार बदलल्यानंतर याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असेही ते म्हणाले. विजापूर, गुलबर्गा यासारख्या शहरात रिंगरोड झाले पण सोलापुरात ते करता आले नाही.
विकासाचे हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याऐवजी स्वार्थी राजकारण करणारे भाजप सरकार आणि त्या पक्षाचे आमदार यांनी दक्षिण सोलापूरला विकासापासून दूर नेले आहे. या मतदारसंघातील अधोगतीमुळे निर्माण झालेले चित्र बदलायचे आहे. त्यासाठी आपण मला संधी दिली तर पुढच्या पाच वषार्र्ंत नक्की चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास काडादी यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना डॉ. इरेश स्वामी म्हणाले, दक्षिण सोलापूरला फार मोठी राजकीय परंपरा लाभली आहे. लोकांनी आग्रह केल्यामुळे धर्मराज काडादी यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते सुसंस्कृत, अभ्यासू उमेदवार आहेत. या मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास ते सक्षम आहेत. कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्यानंतर त्यांना ही संधी मिळणार आहे. मतदारांनी अन्य विचार करुन मत वाया घालवण्यापेक्षा काडादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन स्वामी यांनी केले.
अॅड. रा. गो. म्हेत्रस म्हणाले, पन्नास वषार्र्ंपूर्वी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी खासदार, आमदार होते. आता धर्मराज काडादी यांना निवडून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संविधान वाचवण्यासाठी हे करणे गरजेचे आहे. भाजप सगळ्या स्वायत्त संस्था ताब्यात घेऊन घाणेरडे राजकारण करत आहे. ते रोखले पाहिजे.
कामगार नेते गोवर्धन सुंचू म्हणाले, धूम्रपान कायद्यामुळे विडी उद्योग संकटात आहे. यंत्रमाग कामगारांचे प्रश्न आहेत. भाजप सरकारचे धोरण कामगार विरोधी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत धर्मराज काडादी निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
के. एम. जमादार म्हणाले, जे काम शिवदारे, देवकते, कमळे गुरुजींनी केले तेच काम धर्मराज काडादी करीत आहेत. दक्षिणच्या विकासासाठी त्यांना विधानसभेवर पाठवणे आपले कर्तव्य आहे.
रवी आडगी म्हणाले, दक्षिणमध्ये बदल घडवायचा आहे, हीच मानसिकता ठेवा. मतदान केंद्रांवर गेल्यानंतर नाव आणि चिन्ह यांचा गोंधळ होतो. त्यामुळे लोकांपर्यंत चिन्ह पोहोचवा. दक्षिण तालुक्यात चांगले उद्योग आणता येतात. त्यासाठी दृष्टी असलेला आमदार हवा. धर्मराज काडादी यांच्याकडे नेतृत्व गुण आहेत. आपण त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे.
शंकर पाटील म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेबांनी विकासाची खूप कामे केली. तोच वारसा घेऊन निघालेले धर्मराज काडादी यांना संधी दिली पाहिजे. ज्यांना राज्यघटना मान्य नाही अशांना बाजूला करण्याची वेळ आली आहे. देशात मोदींची अघोषित आणीबाणी आहे. समाजवाद त्यांना नष्ट करायचा आहे. अशावेळी काडादी यांच्यासारखी चांगली माणसे निवडून दिली पाहिजेत.
प्रा. नीलिमा माळगे यांनी आपल्या भाषणात धर्मराज काडादी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गुणगौरव केला. ते दूरदृष्टीचे आहेत. त्यांचा विचार समतावादी आहे. स्वच्छ व्यक्तिमत्त्व, मृदुभाषी आणि दुसर्याबद्दल आदरभाव बाळगणारे आहेत. ते निवडून येणे ही काळाची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
शिवा बाटलीवाला म्हणाले, निवडणूक अवघड असली तरी जिंकण्याची पध्दत सोपी आहे. प्रत्येकाने आपल्या घराशेजारच्या चार घरात सांगून जरी मते मिळवली तरी काडादी सहज निवडून येतील. प्रा. शहाबुद्दीन शेख, विजय शाबादी यांनीही काडादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून रात्रीचा दिवस करुन निवडून आणू अशी ग्वाही दिली.
प्रारंभी प्रा. अशोक निंबर्गी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी धर्मराज काडादी यांची भूमिका स्पष्ट केली. सध्याचे राजकीय वातावरण आणि भाजप आमदारांची कार्यपध्दती यावर जोरदार टीका केली. सूत्रसंचालन प्रा. संतोष पवार यांनी केले तर अॅड. शिवशंकर घोडके यांनी आभार मानले. यावेळी भीमाशंकर जमादार, अख्तरताज पाटील, बसवराज शास्त्री, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
हद्दवाढ भागात यात्रिक निवास उभारू ..!
शहरी भागात नागरी सुविधा नाहीत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, हॉस्पिटल याची गरज आहेच परंतु पर्यटकांसाठी सुविधा निर्माण केल्या तर त्याचा फायदा होईल. गाणगापूर, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर या तीर्थक्षेत्रांना हजारो भाविक जातात. त्यांच्यासाठी हद्दवाढ भागात यात्रिक निवास उभारता येईल. पंचतारांकित हॉटेल, क्रीडांगण, मनोरंजनाचे केंद्र याची गरज आहे.
हद्दवाढ भागात जागेचे व्यवहार होत नाहीत. तो प्रश्न सोडवला पाहिजे. बससेवा, एसटी स्थानक, रेल्वे स्थानक यांचीही गरज आहे. रोजगारासाठी स्थलांतरित होणार्या इथल्या तरुणांना रोखून त्यांच्या हाताला काम देण्यासाठी चांगले उद्योग आणले पाहिजेत, असेही काडादी आपल्या भाषणात म्हणाले.